| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ मे २०२५
राज्यात नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले असून, यंदाही मुलींनीच यशाचं शिखर गाठलं आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागल्याने तिथे आनंदाचे वातावरण आहे. निकालानंतर अनेक पालक आणि नातेवाईक आपल्या पाल्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांची गुणपत्रिका सोशल मीडियावर शेअर करतात – फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप स्टेटस यावर निकालाचे स्क्रीनशॉट झळकतात. मात्र, ही आनंदाची पोस्ट तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते!
अनेक वेळा निकालाचे फोटो शेअर करताना त्या गुणपत्रिकेत असणारी वैयक्तिक माहिती – विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, बोर्डाचा सीट नंबर, शाळेचे नाव, आई-वडिलांचे संपूर्ण नाव – हे सर्व सहजपणे उघड होतं. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ही माहिती अत्यंत संवेदनशील असून, सायबर गुन्हेगार अशा माहितीचा गैरवापर करू शकतात.
सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा माहितीच्या आधारे फसवणूक, बनावट डॉक्युमेंट तयार करणे, किंवा इतर सायबर गुन्हे घडू शकतात. त्यामुळे आपल्या पाल्याच्या यशाचा गौरव करताना सजग राहणे अधिक आवश्यक आहे.
काय करावे?
- जर फोटो शेअर करावाच असेल, तर इरेझिंग टूल वापरून अनावश्यक माहिती हटवा.
- शक्य असल्यास गुणपत्रिकेचा फोटो न टाकता फक्त टक्केवारी किंवा "मुलगा/मुलगी उत्तीर्ण झाला/झाली" अशा स्वरूपात साधी पोस्ट करा.