yuva MAharashtra "निष्ठावंतांना प्राधान्य देत निवडणुकांची तयारी" – मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका

"निष्ठावंतांना प्राधान्य देत निवडणुकांची तयारी" – मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ३० मे २०२५

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा शंखनाद होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली असून, मिरज तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निवडणुकांसाठी तयारीचा प्रारंभ केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्ष बैठकीत, ताकदीचे आणि पक्षाशी निष्ठावान उमेदवार निवडणुकीसाठी पुढे रेटले जातील, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक पक्ष निरीक्षक टी. व्ही. पाटील आणि राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आगामी निवडणुकांत पक्षाला लोकांपर्यंत पोहोचण्याची महत्त्वाची संधी आहे, यावर बैठकीत भर देण्यात आला. केवळ निवडणुकापुरती नव्हे, तर सातत्याने जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारी भूमिका पक्षाने घेतली पाहिजे, असे निरीक्षकांनी स्पष्ट केले.

पक्षाचे संघटन अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक गावात बूथ कमिटी सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, गावपातळीवर थेट संपर्क वाढवण्यावरही विशेष चर्चा झाली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सर्व संबंधितांशी सविस्तर चर्चा होईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


या बैठकीस तालुकाध्यक्ष वास्कर शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रदीप सावंत, प्रमोद इनामदार, बाबासाहेब गायकवाड, सुरेश कोळेकर, प्रणव पाटील, राहुल पाटील, प्रशांत माळी, मोहन गवळी, अधिक पाटील, संतोष रिसवडे, संजय चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.