yuva MAharashtra राज्यात दिवाळीपूर्वी निवडणुकांचा रणसंग्राम; 'कामाला लागण्याचा' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संदेश !

राज्यात दिवाळीपूर्वी निवडणुकांचा रणसंग्राम; 'कामाला लागण्याचा' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संदेश !


| सांगली समाचार वृत्त |
नाशिक - दि. १९ मे २०२५

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक अखेर ठरण्याच्या मार्गावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्यात असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

या वेळी बोलताना अजित पवार यांनी देशातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यांचा उल्लेख करत, केंद्र सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास ठोस प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले. “भारताच्या लष्कराने देशाची ताकद जागतिक स्तरावर दाखवून दिली आहे. त्यांना सलाम,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना पवार म्हणाले की, "या निवडणुका मुळात 2022 मध्ये होणे अपेक्षित होत्या, पण विविध कारणांमुळे विलंब झाला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आगामी चार महिन्यांत निवडणुकांची प्रक्रिया होईल."


त्याचप्रमाणे, त्यांनी दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करत, "स्वराज्याची संकल्पना खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूपात आणण्यासाठी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा स्थापन करण्यात आल्या. त्या मार्गावर आज आपण पुढे चाललो आहोत,” असे त्यांनी सांगितले.

राज्यातील ओबीसी समाजासाठी पूर्वीप्रमाणे २७ टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्तरावर नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, प्रत्येकाने काम करून स्वतःची क्षमता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.