| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ११ मे २०२५
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर अखेर शस्त्रसंधीसाठी दोन्ही देशांमध्ये एकमत झालं आहे. परस्परांवरील हल्ले थांबवण्याच्या निर्णयावर सहमती दर्शवण्यात आली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत कारवाई सुरू केल्यानंतर पाकिस्तान दबावात आला आणि चर्चेसाठी पुढाकार घेतला.
पाकिस्तानच्या सैन्य दलाच्या प्रतिनिधीने दुपारी 3.30 वाजता भारताशी संपर्क साधत चर्चेला सुरुवात केली. या चर्चेनंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी शस्त्रसंधीचे अनुकरण करण्याचा निर्णय घेतला. 12 मे रोजी दुपारी 12 वाजता यासंदर्भात पुढील बैठक होणार असल्याची माहिती मिळते.
या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कमोडोर रघु आर नायर, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी आपली भूमिका मांडली.
"जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही पातळ्यांवर सर्व लष्करी हालचाली थांबवण्यासाठी एक सुस्पष्ट करार करण्यात आला आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांना या कराराच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत," असं स्पष्ट करताना कमोडोर नायर यांनी पाकिस्तानला इशाराच दिला.