yuva MAharashtra "युद्धाचे सावट गडद असले तरी पण देशाची गती अबाधित राहिली पाहिजे" – नरेंद्र मोदी

"युद्धाचे सावट गडद असले तरी पण देशाची गती अबाधित राहिली पाहिजे" – नरेंद्र मोदी


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १० मे २०२५

भारत-पाकिस्तान सीमारेषेवर तणाव शिगेला असतानाच, देशाच्या आतल्या व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ न देता ती सुरळीत चालू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले आहेत.

दहशतवाद्यांकडून झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने निर्णायक भूमिका घेतली असून ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई दलाने पाकिस्तानमध्ये कारवाई केली. या कारवाईने पाकिस्तानच्या हालचालींना प्रत्युत्तर मिळाले असून, त्यांनी गुरुवारी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारताने नौदलालाही अलर्टवर ठेवून सज्जतेचे आदेश दिले, ज्यामुळे युद्धाची शक्यता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशातील प्रशासनातील २० महत्त्वाच्या विभागांच्या सचिवांशी चर्चा करून, ‘अत्यावश्यक सेवा आणि सुविधा कोणत्याही परिस्थितीत विस्कळीत होता कामा नये’ असा सक्त आदेश दिला. “निर्णय घेण्यासाठी आदेशांची वाट पाहू नका; गरज पडल्यास तातडीने पावले उचला,” असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला.


अणुऊर्जा, अंतराळ संशोधन, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, वाणिज्य, पायाभूत सुविधा यासारख्या विविध क्षेत्रांतील सचिवांनी पंतप्रधानांसमोर आपापली तयारी दोन मिनिटांत मांडली.

पंतप्रधानांनी महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या – कोणत्याही आपत्कालीन स्थितीत अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती वाढू नयेत, लोकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये, साठेबाजी टाळावी यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. अफवांवर नियंत्रण ठेवण्याचेही त्यांनी सुचवले.

देशाची सुरक्षितता जशी महत्त्वाची आहे, तशीच देशातील सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाची गती अबाधित ठेवणेही आवश्यक असल्याचे मोदींनी अधोरेखित केले.