| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० एप्रिल २०२५
विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडफोड कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मंदिर तोडफोड कारवाईनंतर, विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाने धडक मोर्चा काढला. जैन मंदिरावर कारवाई केलेल्या वॉर्ड ऑफिसरवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तेव्हा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा आदेश काढला.
वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशाने पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दिगंबर जैन मंदिरावर तोडफोड कारवाई केली होती. याच मंदिर कारवाई प्रकरणी जैन समाजाच्या लोकांनी विलेपार्लेपासून अंधेरी पूर्वमधील विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महापालिकेने या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे
मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात दिगंबर जैन मंदिरावर पालिकेने तोडफोड कारवाई केली.
पालिकेचे सहाय्यक आयुक्त म्हणून अंधेरी के पूर्व विभागात नवनाथ घाडगे यांची दहा दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली होती. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान जैन धर्मियांचे धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर फेकल्याचा आरोप करण्यात आला. धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू बाहेर काढल्यानंतर कारवाई करावी अशी विनंती केल्याचा दावा काही जैन समाजातील लोकांनी केला. जैन धर्मियांच्या विनंतीला मान न देता पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने केली तोडफोड कारवाई केल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या ठिकाणी जैन मंदिर होते, त्या ठिकाणी ते पुन्हा बांधून देण्याची मागणी जैन धर्मियांकडून करण्यात येत आहे.