| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० एप्रिल २०२५
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यात डोंबिवली येथील तीन, पुण्यातील दोन आणि पनवेल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्यातील अनेक कुटुंबांवर शोककळा पसरली असताना, त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. तसेच, कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात येईल, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
डोंबिवली येथील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी – हे तीन मावस भाऊ आपल्या कुटुंबांसह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले असताना या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी व मुलांसह एकूण ९ जण होते. त्याचप्रमाणे पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला. संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती, ज्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ मान्यता दिली होती. ही नोकरी देण्याचा निर्णय आज अधिकृतपणे मंजूर करण्यात आला.
पनवेलचे दिलीप दिसले हे आपल्या पत्नीसमवेत काश्मीरला गेले होते. हल्ल्यात गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांसाठी केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर त्यांच्या शिक्षण व उपजीविकेच्या दृष्टीनेही राज्य सरकार पावले उचलणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, राज्यात लवकरच सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येणार असून, इलेक्ट्रिक वाहन खरेदी आणि टोल सवलतीबाबतही धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.