| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जानेवारी २०२५
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पात्रतेची तपासणी सुरू झाली आहे. या प्रक्रियेची भीती अनेक अपात्र लाभार्थ्यांना वाटत असून, सांगली जिल्ह्यातील १४ महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतला आहे. येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये मिळतात. सांगली जिल्ह्यात एकूण ७.७३ लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
तथापि, अनेक अपात्र महिलांनीही या योजनेसाठी अर्ज केला असल्याचे समोर आले आहे. सरकारने अपात्र महिलांना लाभ सोडण्याचे आवाहन केले होते. जिल्ह्यातून आतापर्यंत १४ महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वृषा पाटील यांनी दिली.
अपात्र लाभार्थींनी कसा सोडावा लाभ ?
ज्या महिलांना लाभ सोडायचा आहे, त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद) यांच्याकडे अर्ज सादर करावा.
अपात्रतेचे निकष
1. ज्या महिलांचा कुटुंबीय आयकर भरतो.
2. चार चाकी वाहन मालकीच्या महिला.
3. इतर सरकारी योजनेचा पूर्ण लाभ घेतलेल्या महिला.
वसुली न होण्याचा निर्णय
या योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांपर्यंत रक्कम वितरित झाली आहे. परंतु, अपात्र लाभार्थींनी मिळालेला लाभ परत करावा लागणार नाही. मात्र, त्यांना यापुढे कोणताही लाभ दिला जाणार नाही.
सर्वाधिक अर्ज मिरज तालुक्यातून
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून सर्वाधिक, दोन लाखांहून अधिक अर्ज आले असून, यामध्येही अपात्र लाभार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळले आहे.
महत्वाचे: अपात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून अर्ज मागे घेऊन योजनेतून बाहेर पडावे, जेणेकरून योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळेल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.