| सांगली समाचार वृत्त |
पलूस - दि. २६ डिसेंबर २०२४
कडेगाव विधानसभा मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या जोरदार व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने विजय मिळाला. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माझ्यासह कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्याकडून मिळालेला जनसेवेचा वसा कधीच सोडणार नाही. मतदार संघातील विकासाची गंगा यापुढेही प्रवाहित ठेवणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत राहणार आहे. असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
पलूस येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार डॉ. कदम बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, घनःशाम सुर्यवंशी, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रदेश काँग्रेसचे सदस्य उत्तमराव पवार, सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पुदाले, पांडुरंग सुर्यवंशी, पलूस नगरपालिकेतील माजी गटनेते सुहास पुदाले, गणपतराव सावंत उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकाल धक्कादायक लागले. एक्झिट पोलचे अंदाजही चुकले. नेमकं काय घडलं, यासाठी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
पलूस - कडेगाव विधानसभा मतदार संघात विजय मिळाला. मात्र, येथील निकालानंतर माझ्यासह कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून स्व. डॉ. पतंगराव कदम व त्यानंतर मी काम करत आहे. महापूर असो, व्यक्तीगत आरोग्याची, शिक्षणाची मदत असो आपण ती करत आलो. आपण केलेले काम समोर आहे. सर्व स्तरावर मदत केली आहे.
निवडणूक निकाल पाहता, मतदार संघात जे घडले ते मी प्रामाणिकपणे स्विकारले असते , मात्र, समोरचा उमेदवार तुल्यबळ असता तर. मग आपण चुकलो कुठे की आपल्या भोवती असणारे लोक चुकले, नेमके काय घडले, याची माहिती घेत आहे. असे त्यांनी सांगितले.
आमदार डॉ. कदम म्हणाले, महापूराच्या काळात असो, कोरोनाचे काळात असो किंवा इतर संकटात मदत करण्याची शिकवण स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी दिली आहे. त्यांचे हेच संस्कार आहेत. विधानसभा निवडणूक निकालानंतर माझ्या स्वभावात बदल करण्याचे ठरवले आहे. कामाच्या पध्दतीत बदल करण्याची गरज आहे. यापुढे केलेल्या कामाची, मदतीची कार्यकर्ते आणि जनता जाणीव ठेवतील. असा विश्वास आहे. यापुढेही मतदार संघातील विकासाची गंगा प्रवाही ठेवणार आहे.
प्रास्ताविक सुहास पुदाले यांनी केले. यावेळी बाळासाहेब पवार, घनःशाम सुर्यवंशी, उत्तमराव पवार, गणपतराव पुदाले, बापूसाहेब पवार यांची भाषणे झाली. यावेळी पलूस तालुक्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.