yuva MAharashtra लहानपणी ज्या मंत्रालयात अगरबत्ती विकली तिकडंच मंत्री म्हणून पदभार घेतला !

लहानपणी ज्या मंत्रालयात अगरबत्ती विकली तिकडंच मंत्री म्हणून पदभार घेतला !

                  फोटो सौजन्य : Getty images
| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ डिसेंबर २०२
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपद आणि खाते वाटपाचा तिढा सुरू होता. निकालाच्या जवळपास 20 ते 22 दिवसांनी खाते वाटप जाहीर करण्यात आले. तर, खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आज बऱ्याच मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला. या सगळ्या घडामोडीत लहानवयात ज्या मंत्रालयात अगरबत्ती, कॅलेंडर विकले. त्याच, मंत्रालयात त्या मुलाने मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

एखाद्या सिनेमाला साजेशी एक गोष्ट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबाबतही गोष्ट घडली आहे. आज प्रताप सरनाईक यांनी परिवहन खात्याचा पदभार स्वीकारला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले आगामी निर्णय सांगताना भूतकाळही जागवला.

अन् त्याच मंत्रालयात आज कॅबिनेट मंत्री....

सरनाईक यांच्या बालपणाचा काळ काहीसा आव्हानात्मक गेला. घरच्या आर्थिक खर्चाला हातभार लावताना सरनाईकांनी काही व्यवसाय केले. त्याचीच आठवण आज मंत्रालयात प्रताप सरनाईक यांनी सांगितली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मंत्रालयाशी माझा संबंध आता काही वर्षातील नाही. लहानपणापासूनचा संबंध आहे. मुंबईतील दादरमध्ये राहत असताना मी मंत्रालयात येत असे. वयाच्या 12 व्या वर्षी या मंत्रालयात मी कॅलेंडर आणि अगरबत्ती विकायला यायचो, अशी आठवणही त्यांनी सांगितली. लोकांचे प्रेम, आशिर्वाद आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दाखवलेला विश्वास यामुळे आपण पुन्हा एकदा त्याच मंत्रालयात कॅबिनेट मंत्री म्हणून इथं आलो असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

मुंबईतून डोंबिवलीमध्ये राहण्यास गेल्यानंतर ऑटो रिक्षा चालक म्हणून आणि रात्रीच्या वेळी ऑम्लेट पावची गाडी लावून घरच्या आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

पहिल्याच दिवशी एसटीसाठी महत्त्वाचा निर्णय...

एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत लवकर कागदोपत्री निर्णय जाहीर केला जाणार, असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. परिवहन खात्यातील बदल्या बढत्यांमध्ये पारदर्शकता आणण्याकरता ॲानलाईन बदल्या आणि बढत्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी हाताशी घेऊन बदल्या होणार नाही. एसटी सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील असून संपूर्ण बदल्या ऑनलाईन करणार असल्याचं देखील सरनाईक यांनी म्हटलं आहे. याच आठवड्यात अंमलबजावणी होईल, अशी आश्वासन देखील सरनाईक यांनी दिले आहे.