| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, आता एक्झिट पोलही आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलचे आकडे महायुतीसाठी आनंदाच्या बातमीचे संकेत देत आहेत. यांपैकी मॅट्रीजच्या आकडेवारीनुसार, राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार) यांचे 'ट्रिपल इंजिन' अथवा 'तिकडी' 170 जागा जिंकू शकते. महत्वाचे म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महायुती 175 जागांच्या जवळपास जागा जिंकेल, अशी भविष्यवाणी केली होती.
महायुतीच्या 'ट्रिपल इंजिन'ला किती जागा ?
मॅट्रीजच्या Exit Poll नुसार, राज्यातील 288 जागांपैकी महायुती 150 ते 170 जागा मिळत आहेत. यांपैकी भाजपाला 89 ते 101, शिवसेने (एकनाथ शिंदे) 37 ते 45 आणि एनसीपी (अजित पवार) 17 ते 26 जागा जिंकू शकते.
महाविकास आघाडीला किती जागा -
तर, महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळत आहेत. यात काँग्रेसला 39 ते 47, शिवसेना ठाकरे गटाला 21 ते 29 आणि एनसीपी (शरदचंद्र पवार) 35 ते 43 जिंकू शकतात. महत्वाचे म्हणजे 2019 मध्ये भाजपा आणि अखंड शिवसेना एकत्रित लढले होते. मात्र नंतर, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि एनसीपीसोबत जाऊन सरकार स्थापन केले होते.
अजित पवारांची भविष्यवाणी -
तत्पूर्वी, प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीला मिळणाऱ्या जागांसंदर्भात अंदाज व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य आम्ही समोर ठेवले आहे. एवढेच नाही, तर त्यासाठी महायुतीमधील प्रत्येक घटकपक्ष प्रयत्नशील आहे. तशा पद्धतीने आमचे काम सुरू आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.