yuva MAharashtra "होय, EVM मुळेच जिंकलो !" भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला अर्थ !...

"होय, EVM मुळेच जिंकलो !" भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला अर्थ !...


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २८ नोव्हेंबर २०२
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच देशभरात पुन्हा एकदा ईव्हीएमविरोधात रान पेटले आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएम सेट झाल्याचा आरोप करण्यात आला असून काँग्रेसकडून देशभरात ईव्हीएमविरोधात यात्रा काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यावरून भाजपने बुधवारी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँगेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ईव्हीएम मशीन नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या घरी ठेवा, आम्ही मतपत्रिका आणू, असे खर्गे यांनी म्हटले होते. होय, मोदींच्या घरी ईव्हीएम मशीन आहे. ई म्हणजे एनर्जी, व्ही म्हणजे विकास आणि एम म्हणजे मेहनत. मशीनप्रमाणे मोदीजी काम करत आहेत. त्यांच्याकडे ती ऊर्जा आहे. विकासासाठी ते काम करत आहेत. या 'ईव्हीएम'मुळेच भाजप विजयी होत आहे.

तुम्ही आरबीएममुळे पराभूत होत आहात. राहुल्स बेकार मॅनेजमेंट. मशीनमध्ये खराबी नाही, तर नेतृत्वामध्ये आहे. तुम्ही आधी राहुल गांधींना बदला नंतर ईव्हीएम बदला. मल्लिकार्जून खर्गे यांनाही हे माहिती आहे, पण ते बोलत नाहीत, असा टोला पात्रा यांनी लगावला.


प्रत्येक राज्यात काँग्रेसला जनतेने बाजूला सारले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेस्तनाबूत झाली आहे. काँग्रेसला केवळ 16 जागा मिळाल्या आहेत. मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधीजी तुम्हाला ईव्हीएम, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, भारत सरकारही नकोय. असे असेल तर तुमच्यासाठी मंगळ ग्रहावर जागा आहे, तिथे काहीच नाही. तिथे जावा, असा निशाणा पात्रा यांनी साधला.

मल्लिकार्जून खर्गे यांनी काल म्हटले की, एससी, एसटी आणि गरिबांची मते ईव्हीएममुळे खराब होत आहेत. एससी, एसटी, ओबीसीच्या लोकांना ईव्हीएममध्ये मते देऊ शकत नाहीत का, ते एवढ अशिक्षित आहेत का, असे काँग्रेसला म्हणायचे आहे का? हा या लोकांचा अपमान आहे, अशी टीकाही संबित पात्रांनी केली.

ईव्हीएमविरोधात यात्रा काढणार असल्याचे खर्गे यांनी जाहीर केले होते. त्यावर बोलताना पात्रा म्हणाले, 'काही ना काही त्यांनी करायला हवे. काँग्रेसकडे काहीही काम नाही. त्यामुळे त्यांनी काहीतरी करायला हवे.' याचवेळी सुप्रीम कोर्टात ईव्हीएमवर सुनावणी सुरू होती. कोर्टाने सुनावणीनंतर ईव्हीएममध्ये खराबी नसल्याचे म्हटले आहे. जो उमेदवार पराभूत होतो, तो ईव्हीएमबाबत बोलतो, असे कोर्टाने म्हटले आहे, असे पात्रा यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने 2017 मध्ये हॅकेथॉन आयोजित केला होता. पण त्यावेळी कुणीही गेले नाही. त्यावेळी काँगेस का गेली नाही? तेथे सिध्द करता आले असते, अशी टीका पात्रा यांनी केली. राजीव गांधी यांनी मतपत्रिकेविरोधात मत व्यक्त केले होते, असा दावा करत पात्रा म्हणाले, वडील मतपत्रिका खराब म्हणतात, मुलगा ईव्हीएम खराब म्हणतो. यांना थेट मुकुट घालायला हवा. त्यांना हेच हवे आहे, असा निशाणा पात्रा यांनी साधला.