| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० नोव्हेंबर २०२४
लोकसभेप्रमाणेच सांगली की विधानसभा निवडणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली ती श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या बंडखोरीने. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी लोकसभेतील बंडखोर उमेदवार यांच्याप्रमाणेच बंडखोरी करून आव्हान उभे केले. त्यांना नेणारा प्रतिसाद हाही चर्चेचा विषय ठरला. मात्र काल संपूर्ण मतदारसंघात एक चर्चा मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाली ती जयश्रीताईंचा पाठिंबा दिलेल्या फेक व्हिडिओची. कुणा अज्ञात व्यक्तीने जयश्रीताईंनी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराजबाबा पाटील यांना पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. पाहता पाहता वायूवेगाने संपूर्ण मतदारसंघात व्हायरल झाला. शेवटी जयश्रीताईंना आपण कुणालाही पाठिंबा दिला नाही, आपली उमेदवारी कायम असून मतदारांनी यावर विश्वास ठेवू नये, असा एक व्हिडिओ आणि बातम्या प्रसिद्ध कराव्या लागल्या.
सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा 2019 चा राजकीय पक्षाला पाठिंबा दिल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यात आला. याप्रकरणी पाटील यांचे निवडणूक प्रतिनिधी गजानन साळुंखे यांनी सांगली शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
सांगलीत भाजप, काँग्रेस व अपक्ष अशी तिरंगी लढत झाली. मतदानाच्या आदल्या रात्री अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत होता. या व्हिडीओत त्या एका राजकीय पक्षाला पाठिंबा देत असल्याचे सांगताना दिसतात. पण हा व्हिडीओ 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी होता. यावर पाटील यांनी तातडीने व्हिडीओद्वारे उत्तर देत हा प्रकार निंदनीय असून, फेक व्हिडीओ असल्याचे म्हटले. त्यांचे निवडणूक प्रतिनिधी गजानन साळुंखे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. सायंकाळी शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली.