| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्रीपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याने मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार, हे आता निश्चित झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण नाराज नसून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आपल्यास मान्य आहे, अशी माहिती पत्रकार बैठकीत दिली आहे. त्यामुळे गेली अनेक दिवस मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? या प्रश्नाचे उत्तर जवळजवळ मिळाले आहे. मुख्यमंत्री पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच पंतप्रधानांचीही फडणवीस यांच्या नावाला पसंती असून शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची नियुक्ती होईल, याबाबतचा पेच निकालानंतर चौथ्या दिवशीही कायम असून, याबाबत भाजप हायकमांडने काहीही निर्णय अद्याप घेतला नसल्याचे कळते. एकनाथ शिंदे हे आता राजीनाम्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री झाले आहेत. नव्या सरकारच्या प्रतीक्षेत राज्यातील जनता, सत्ताधारी पक्षाचे नेते व कार्यकर्ते आहेत. भाजप मुख्यमंत्रीपदावर ठाम असून, २ डिसेंबरपूर्वी राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होण्याची चिन्हे नसल्यामुळे मुंबईत आलेले सत्तारूढ पक्षाचे आमदार आता आपापल्या मतदारसंघांत परतु लागले आहेत. दरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचं स्वागत केलं. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच तुम्ही भेटत आहात. तुमच्या माध्यमांतून सगळ्या मतदारांचे आभार मानतो. हा जो विजय आम्हाला मिळाला तो अभूतपूर्व विजय आहे. गेल्या अनेक वर्षांत असा निकाल जनतेने दिलेले नाही. मागच्या अडीच वर्षात महायुतीने उत्तम काम केलं आहे. एकीकडे विकासकामं केली, महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच दुसरीकडे कल्याणकारी योजना राबवल्या. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं आहे. मी कार्यकत्र्यांचेही आभार मानतो असंही एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले मी जवळपास ८० ते ९० सभा घेतल्या. तसंच एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं. पायाला भिंगरी लावून काम केलं. सीएम म्हणजे कॉमन मॅन ही माझी धारणा आहे. त्यामुळे लोकांशी संवाद साधताना कुठलाही अडथळा येत नव्हता. महाराष्ट्राच्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे असं मला कायमच वाटत होते. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे मी सामान्यांच्या वेदना, काटकसर, तडजोडी सगळं पाहिलं आहे, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला. समाजातल्या सगळ्या घटकांसाठी आपण काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात होती असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मी लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलंही मोजमाप व्हावं म्हणून मी काम केलं नाही. तर सरकार म्हणून काय देऊ शकतो ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. केंद्र सरकार पर्वताप्रमाणे उभं राहिलं हे मी पुन्हा एकदा सांगू शकतो. दोन ते अडीच वर्षांत लाखो कोटींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. त्यामुळे मी एवढंच सांगेन की कुठे घोडं अडलं आहे? मी मनमोकळेपणाने सांगतो आहे, मी काहीही ताणून धरलेलं नाही. मी मोदींना फोन करुन सांगितलं की, सरकार बनवताना अडचण आहे ती माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. एकनाथ शिंदेची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
आमच्यावर मतांचा वर्षाव झाला तो महायुती सरकारने जे काम केलं, जे निर्णय घेतले त्यामुळे झाला आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. लाडक्या बहिणींनी सावत्र भाऊ कोण ते महिलांनी ओळखलं. मी समाधानी आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे. मी नाराज वगैरे मुळीच नाही, आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत, लढून काम करणारे लोक आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांना पंतप्रधानांची पसंती
आम्ही लोकांमध्ये गेलो, घरी बसलो नाही. आम्ही जे काम केलं ते मनापासून केलं. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहिन असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे घेऊन गेलो. आनंद दिघे यांचे विचार घेऊन गेलो. आम्ही पर्वताप्रमाणे तुमच्या मागे उभे आहोत असं आम्हाला अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. आम्हाला त्यांनी मुख्यमंत्रिपद दिलं. मी त्या प्रत्येक दिवसाचा, क्षणाचा वापर राज्याच्या हितासाठी केला. मी मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. कारण त्यांचं पाठबळ लाभलं. या सगळ्या अडीच वर्षांच्या काळात प्रगतीचा वेग वाढला. मी अडीच वर्षांच्या माझ्या कालावधीत समाधानी आहेत. आमच्या सरकारमध्ये जे निर्णय झाले ते आजवर आम्ही जे निर्णय घेतले ते रेकॉर्डब्रेक आहेत. पत्रकार असोत, शेतकरी असो, लाडक्या बहिणी असोत सगळ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले. आमच्या काळात १२४ सिंचन प्रकल्प तयार झाले आहेत. या राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला आहे. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. कारण २३ नोव्हेंबरला जो निकाल लागला, त्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासह शिवसेनेचे नेते दादा भुसे, संजय शिरसाट आणि इतर नेते उपस्थित होते. एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता कायम होती. आता एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा २६ नोव्हेंबरला दिला आहे. त्यामुळे राज्यातली १४ वी विधानसभा बरखास्त झाली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत.