yuva MAharashtra शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊंची पातळी घसरली, शिवराळ भाषेचा वापर, जनतेत प्रचंड नाराजी !

शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊंची पातळी घसरली, शिवराळ भाषेचा वापर, जनतेत प्रचंड नाराजी !


| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. ७ नोव्हेंबर २०२
एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या राजकारणात एक सभ्यता होती, सुसंस्कृतपणा होता. उत्तर भारतीय नेत्यांचे राजकारण कसेही असो, पण महाराष्ट्रातल्या नेत्यांनी मात्र पातळी सोडली नव्हती. विरोधकांवर टीका करताना एक मर्यादा पाळली होती, संकेत पाळले होते. पण आजची स्थिती पाहता राजकीय नेत्यांनी कंबरेचं सोडून डोक्याला कधी बांधलं, भाषणात अर्वाच्च शिव्यांचा कधी वापर केला हे लक्षातच आलं नाही. त्यामध्ये एकाच पक्षाच्या नेत्यांचा सहभाग नाही तर सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग दिसतोय. हे आठवण्याचं निमित्त म्हणजे आमदार सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर केलेलं ताजं वक्तव्य.

महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का ? अरे असला कसला चेहरा... असं वक्तव्य सदाभाऊ खोतांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे सदाभाऊ खोतांचं असं पातळी सोडून केलेलं वक्तव्य हे काही पहिलंच नाही. या आधीही त्यांनी शरद पवारांवर अनेकदा खालच्या भाषेत टीका केली आणि नंतर त्यावरून टीका झाल्यानंतर ती शिवराळ भाषा असल्याचा मुलामा दिला.

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत हे त्यांचे मित्र गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी जतमध्ये गेले होते. त्या ठिकाणी झालेल्या सभेच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते.

शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, "शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणला. एवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा... महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?"


पुढे सदाभाऊ म्हणाले की, "शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे-काँग्रेसवाले असतील, यांनी देवेंद्र फडणवीसांना का घेरायला सुरुवात केलीय माहिती आहे का ? कारण आपण शेतकरी माणसं आहोत. आपल्या घरात गाय असते. राज्याची तिजोरी म्हणजे ही गाय आहे. गायीची जी कास आहे, त्या कासला चार थानं आहेत. यामधील फक्त अर्धच थान वासराला (म्हणजे आपल्याला) पाजायचं आणि साडेतीन थानातलं दूध आपणच हाणायचं. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले ही चारही थानं मी वासरांनाच देणार. त्यानंतर शरद पवारांना नववा महिना लागला. पवारसाहेब म्हणाले, आता माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार?"

या आधीही सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर पातळी सोडून टीका केल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यांच्या टीकेनंतर भाजप अनेकदा अडचणीत आल्याचंही दिसलं. पण सदाभाऊ खोत ग्रामीण नेते आहेत, त्यांची भाषाच शिवराळ आहे असं सांगत त्यांच्या टीकेला शिवराळपणाचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला गेला.

- तुतारी दोनदा वाजते, एकदा नवरी येताना, दुसरी स्मशानात जाताना. (लोकसभा निवडणुकीवेळी केलेलं वक्तव्य)

- शरद पवार सैतान, त्यांना पाप फेडावंच लागेल.

- शरद पवार एवढा पापी जगात कुणी नाही.

- म्हातारं खडूस आहे, तिजोरीची चावी कमरेला लावून हिंडतंय.

- शरद पवार म्हणजे शकुनी मामा.

- शरद पवार हे मुस्लिमांचे सासरे.

- बारामतीचे वळू.

- शरद पवारांना नववा महिना लागला. पवारसाहेब म्हणाले, आता माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार?

सदाभाऊ खोतांना प्रचाराच्या स्टेजवर बोलावणं हे भाजपसाठी अवघड जागेचं दुखणं होऊन बसल्याचं दिसतंय. सदाभाऊ खोत काय बोलतील, किती पातळी सोडतील हे खुद्द सदाभाऊसुद्धा सांगू शकत नाहीत. सदाभाऊंनी पवारांवर केलेल्या या जहरी टीकेचा भाजपला फायदा होईल की नुकसान हे विधानसभा निकालाच्या वेळीच स्पष्ट होईल.