| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ नोव्हेंबर २०२४
दैनिक 'सकाळ'च्या मास्टर हेड व बोधचिन्हाचा गैरवापर करून समाजमाध्यमात खोट्या बातम्या पसरविण्याचा प्रयत्नांबद्दल सोमवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात संशयित आरोपी लहु गडदे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
यापुढे सकाळ माध्यम समुहाच्यावतीने विविध प्रकाशनांमधील माहिती मजकुराचा गैरवापर करणे, मजकुरात मोडतोड करून खोडसाळपणाने समाजामध्यमांवर प्रसिध्दी करणे असे प्रकार करणाऱ्यांची गंभीर दखल घेतली जाणार आहे. अशा प्रत्येक प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील, असेही 'सकाळ' व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, जत येथील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या बद्दलची ही खोडसाळ पोस्ट होती. यात 'साप्ताहिक आपली बातमी' नावाच्या व्हॅटस्ॲप ग्रुपवर लहू गडदे नावाच्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलवरून 'सकाळ'चे मास्टर हेड वापरून संबंधित उमेदवाराविषयी खोटी माहिती पसरवली आहे. 'सकाळ'च्या पानाच्या डिजिटल पानाचा गैरवापर केला आहे. हा फेक न्युजचा प्रकार 'सकाळ'ची बदनामी करणारा आहे.
सदरचा मजकूर ११ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजून १९ मिनिटांनी समाजमाध्यमांवर दिसून येत आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १७५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. यापुढेही ज्या ज्या माध्यमांवरून ही पोस्ट प्रसिध्द केली आहे; अशा स्वराज्य माझा न्यूज, शहीद भगतसिंह ग्रुप उमदी, गणी भाई युवा मंच, जत शहर युवक काँग्रेस या व्हॅटस्ॲप ग्रुपवरही संशयितीने ही पोस्ट व्हायरल केली आहे. याप्रकरणी सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सुजाता भोपळे करीत आहेत. एकूणच हा प्रकार 'सकाळ'च्या विश्वासार्हतेला धक्का लावणारा असून त्याची गंभीर दखल सकाळ व्यवस्थापनाने घेतली आहे. यापुढेही असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे 'सकाळ'च्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
''समाजमाध्यमांवर अनधिकृत बातम्या, फेक व्हिडिओ-ऑडिओ क्लिपवर विश्वास ठेवू नये. असा चुकीचा मजकूर समाजमाध्यमांवर प्रसिध्द होणार नाही याची दक्षता ग्रुप ॲडमीन व नेटीझन्सनी घ्यावी. अन्यथा यातील सर्व दोषींवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारांबाबत सायबर विभागातर्फे करडी नजर ठेवली जात आहे. नागरिकांनीही सध्याच्या निवडणूक काळात असे खोडसाळ प्रकार लक्षात आले तर तातडीने नागरिकांनी पोलिसांना कळवावे. ''
-संदीप घुगे
पोलिस अधीक्षक, सांगली