yuva MAharashtra पैसे वाटल्याच्या आरोपांवर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,"सारं गैरसमजुतीतून झालं !"

पैसे वाटल्याच्या आरोपांवर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,"सारं गैरसमजुतीतून झालं !"



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ नोव्हेंबर २०२
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलमध्ये राडा केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या राड्यावर आता विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले विनोद तावडे ? 

सदर सर्वप्रकरणावर विनोद तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी इथल्या कार्यकर्त्यांना मतदानासंदर्भात माहिती द्यायला आलो होतो. बहुजन विकास आघाडीच्या लोकांचा गैरसमज झाला, की मी पैसे आणले. त्यांनी सगळं तपासलं पण काहीच पैसे मिळाले नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे. सगळं गैरसमजातून झालं, असं विनोद तावडे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यापूर्वी वसई-विरारमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे. या हॉटेलात भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजन नाईक उपस्थित होते.


तावडे हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते ?

यावेळी हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्य राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप करण्यात आला आहे. विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते.

त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले आणि त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांची दमछाक होत आहे.