yuva MAharashtra गावातील पोलिस स्टेशन बांधले नाही अन् निघाले राज्याचे नेतृत्व करायला; अजित पवार-जयंत पाटलांमध्ये वार- पलटवार

गावातील पोलिस स्टेशन बांधले नाही अन् निघाले राज्याचे नेतृत्व करायला; अजित पवार-जयंत पाटलांमध्ये वार- पलटवार


| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. १० नोव्हेंबर २०२
आपल्या मतदार संघातील इस्लामपूर व आष्टा बसस्थानकाची काय अवस्था झाली आहे ? ते पहा. दिवाळी सर्वांना सोबत घेऊन गोडधोड करायची असते. स्वतःच करून खायची नसते. तुम्हाला साधी मतदारसंघातील नागरिकांची दिवाळी साजरी करता येत नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघता, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर केली.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ आष्टा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. जयंत पाटील यांना 35 वर्षात मतदारसंघाचा चौफेर विकास साधता आला असता. परंतु त्यांनी मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर फक्त राजकारणात ओव्हरटेक करणाऱ्यांची जिरवा-जिरवी करण्यासाठी केला असा आरोपही यावेळी अजित पवार यांनी केली. 


'नुसतं काय सांगता, काय बोलता असं बोलून काही होत नाही. अरे काय सांगता... मी जे सांगतो तुमच्या डोक्यात घुसत नाही, मग काय सांगू' असे म्हणत अजित पवार यांनी जयंत पाटील यांची नक्कल करत टीका केली. जयंत पाटलांच्या गावातील पोलिस स्टेशन आजदेखील भाड्याच्या जागेत आहे. जयंत पाटलांना त्यांच्या गावातील पोलिस स्टेशन बांधता येत नाही आणि हे निघाले राज्याचे नेतृत्व करायला असे म्हणत जोरदार टीका केली.

लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो. आता आमच्या चुका आम्ही सुधारल्या आहेत. शेतकरी हा माझ्या देशाचा कणा आहे. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही पाऊले उचलली. येथील लोकप्रतिनिधीना 35 वर्षे तुम्ही निवडून दिले. पण त्यांना येथे एमआयडीसी उभारता आली नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. त्यामुळे त्यांना विकास कामावर बोलण्याचा अधिकार नाही, असेही अजित पवार म्हणाले.

तुम्हाला तालुक्यातील महापुरुषांची स्मारके करता आली नाहीत. रिकव्हरी प्रमाणे दर द्यायचा झाला तर 3800 रुपये टनाला येथील शेतकर्‍याला मिळायला पाहिजे. तुम्हाला साधी मतदारसंघातील लोकांची दिवाळी साजरी करता येत नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघता. ऊस दर देण्यात स्पर्धा असावी. व्यक्तिगत स्वार्थ साधणारी स्पर्धा नसावी, असा टोला त्यांनी लगावला.