yuva MAharashtra जतसाठी पाणी योजनेचे दरवाजे खुले, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे प्रतिपादन !

जतसाठी पाणी योजनेचे दरवाजे खुले, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे प्रतिपादन !



| सांगली समाचार वृत्त |
उमदी - दि. १८ नोव्हेंबर २०२
महाराष्ट्र व कर्नाटकला लागून सीमेचा बांध असला तरी पाण्यासाठी जत तालुक्याला आमच्या पाणी योजनेचे दरवाजे कायम खुले राहतील, असे प्रतिपादन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले. जत विधानसभेचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ उमदी येथे जाहीर सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, कर्नाटकच्या महिला व बालविकासमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री एस. आर. पाटील, सक्षणा सलगर, जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे, नाना शिंदे, पिराप्पा माळी, चनाप्पा होर्तिकर, रमेश पाटील, रेश्माका होर्तिकर, मोहन कुलकर्णी, बाबासाहेब कोडग उपस्थित होते.

शिवकुमार म्हणाले, आमच्या गडीनाड भागात आल्यावर कर्नाटकात आल्यासारखेच वाटते. आम्ही आमच्या भागातील दुष्काळ जवळून अनुभवला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील आमच्या गडीनाड भागातील बांधवांची होरपळ होऊ नये, असे आम्हाला मनापासून वाटते. विक्रम सावंत यांची या भागाला पाणी मिळविण्यासाठीची धडपड मी जवळून बघतली आहे. तुम्ही विक्रम सावंत यांच्या पाठीशी राहा, जत तालुक्यातील गडीनाड गावासाठी आमच्या पाणी योजनेची दरवाजे कायम खुले राहतील, हा विश्वास देण्यासाठी मी आलोय.

भाजपने कायमच फोडाफोडीचे धोरण स्वीकारले. जातीपातीत तर भांडणे लावलीच; पण पक्ष फोडण्याचे पाप ही केले. महाराष्ट्रातील शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली व एक डुप्लिकेट सरकार बनवले. या सरकारने आमच्या पंचसूत्रीची कॉपी करून जाहीरनामा प्रसिद्ध केला; पण या जाहीरनाम्याची गॅरंटी राहिली नाही. या सरकारप्रमाणेच डुप्लिकेट जाहीरनामा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आ. विक्रम सावंत म्हणाले, आम्ही विलासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जात आहोत. मात्र, भाजप जातीपातीचा अजेंडा राबवून तालुक्याची शांतता भंग करू पाहत आहेत. अशा प्रवृत्तीला वेळीच गाडले पाहिजे.

महाराष्ट्रात धनगर समाजाला आरक्षण नाही

कर्नाटकात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. बहुसंख्येने लिंगायत समाज असला तरी आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून समाजाला न्याय दिला; पण महाराष्ट्रात धनगर समाजाला साधे आरक्षण दिले जात नाही हे दुर्दैव आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केला.