| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ नोव्हेंबर २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षात झालेली बंडखोरी दुर्देवी असून, भोळ्याभाबड्या जयश्रीताईंनी कोणीतरी फितवले आहे. त्यामुळेच त्यांनी बंडखोरी केली आहे. ज्यादिवशी आपल्याला त्याचे नाव समजेल, त्यादिवशी त्याची खैर नाही, असा गर्भित इशारा काँग्रेसचे युवा नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांनी दिला.
यावेळी बोलताना आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, माझ्यावर डॉ. पतंगराव कदम यांचे संस्कार आहेत. आत एक आणि बाहेर एक असे आमच्यात नसते, मी काँग्रेस मधील बंड शमविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आमचे नेते राहुल गांधी, केंद्रीय नेतृत्व खर्गे, रमेश चेन्निथला, नाना पटोले यांच्याकडून शब्द घेतला होता की, सांगली विधानसभेबरोबरच विधान परिषदेची जागा देईन. त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी जो इच्छुक आपली उमेदवारी मागे घेईल त्याला विधान परिषदेत पाठवण्यात येईल. परंतु येतील बंड शमवण्यात आम्हाला अपयश आले. पृथ्वीराज पाटील यांनी केलेल्या कामाच्या जोरावर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता आम्ही सारे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी जीवाचे रान करू.
सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते मारूती चौकात झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून मारूती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या सभेत आमदार डॉ विश्वजीत कदम बोलत होते. सभेला जयकिसान आंदोलनाचे प्रणेते योगेंद्र यादव, काँग्रेसचे निरीक्षक आमदार बी. आर. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, कॉ. उमेश देशमुख, सुखदेवसिंग, शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार विश्वजीत कदम पुढे म्हणाले की, सांगली जिल्ह्यात संकटातून काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. लोकसभेला गोंधळ झाला, पुन्हा विधानसभेला तेच. माझ्याकडं जादूची कांडी आहे का ? लोकसभा एकाला, विधान परिषद एकाला, विधानसभा एकाला सगळं ठरलं होतं. राहूल गांधींनी मला तो शब्द दिला होता. मला वाटलं असतं तर मी जत, पलूस कुठेही विधान परिषद देऊ शकलो असतो, मात्र मला सांगलीचा प्रश्न महत्वाचा होता. एक पाऊल मागे येऊन निर्णय घेणं गरजेचं होतं. पतंगरावसाहेबांना दोनवेळा उमेदवारी मिळाली नव्हती. वाट पहावी लागते, सांगलीत मात्र तसे झाले नाही. विशाल पाटलांची कोंडी झाली, जयश्रीताईंवर कसला दबाव होता माहिती नाही. मी तासन् तास बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. हात जोडून विनंती केली. आपणाला भाजपला हरवायचं आहे. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत, ज्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता येणं गरजेचं आहे. त्यासाठी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन आ. विश्वजीत कदम यांनी केले. जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समितीच्या निवडणुका लढविल्या. महापालिकेत महापौरपदाची निवडणूक देखील लढलो. पण या निवडणुकीत आम्ही फसलो गेले आहे. पण आता परत फसणार नाही, असा थेट इशारा आ. विश्वजीत कदम यांनी व्यासपीठावर बसलेल्या संजय बजाज यांना दिला.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, "सांगलीच्या आखाड्यात एक भाजपचा आणि दुसरा भाजप पुरस्कृत उमेदवार आहे. एक भाजपची बी टीम आहे. मी खासदार विशाल पाटलांवर नाराज आहे. जेंव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्याची निवडणूक असते तेंव्हा त्यांना काँग्रेस एकसंध हवी असते, माझ्यासारख्या कार्यकर्त्याची वेळ येते तेंव्हा पक्षात फुट कशी पडते? ही फूट देवेंद्र फडणवीस यांनी ठरवून पाडली. साम, दाम, दंड, भेद वापरला. त्यांनी गुंड्या फिरवल्या म्हणून गाडगीळ पुन्हा मैदानात आले. अन्यथा, थेट एकास एक लढाईतून त्यांनी पत्र लिहून कधीच पळ काढला होता. मी पळणार नाही, मी सांगलीच्या मातीत जन्मलो, वाढलो. याच मातीत शेवटचा श्वास घेणार. तोवर सांगलीसाठी झटत राहणार आहे. असा ठाम विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला
यावेळी बोलताना परतुरेश पाटील पुढे म्हणाले की, जयश्रीताई मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी विधानसभा जिंकल्यानंतर विश्वजीत यांच्या सोबत दिल्लीत जाईन, तेंव्हा ताईंसाठी हटून विधान परिषद मागेन. जयश्रीताई तुमसे बैर नहीं, सुधीरदादा तुम्ही खैर नही. या महाभारतात माझी अवस्था अर्जुनासारखी आहे. या लढाईत विश्वजीत कदम माझ्यासाठी श्रीकृष्ण आहेत, ते माझ्या रथाचे सारथ्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांकडे टीका करण्यासाठी कोणताच मुद्दा नाही. त्यामुळे मी कर्नाटकचा असल्याचा अपप्रचार केला जात आहे. पण सांगली माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. माझा जन्म सांगलीत झाला, शिक्षण देखील सांगलीत झाले आहे. सांगलीच्या मातीसाठी झगडतोय आणि शेवटच्या श्वासापर्यंत सांगलीसाठी लढणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, दिलीप पाटील, अभिजित भोसले, हरिदास पाटील, संगीता हारगे, सचिन जगदाळे, मयूर पाटील, शेरू सौदागर, आशा पाटील, कविता बोंद्रे, उमेश देशमुख आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी काँग्रेस अंतर्गत झालेल्या वादामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहत होता. मात्र ते पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये परतले. आ. विश्वजीत कदम यांनी त्यांचे स्वागत केले. रक्तात, अंगात माझ्या काँग्रेस होती. भाजपमध्ये जायला नको होते, अशी खंत मुन्ना कुरणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या पुढील काळात आपण शेवटपर्यंत काँग्रेस सोबत राहू. पृथ्वीराज पाटील यांच्या विजयासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही कोरडे यांनी यावेळी सांगितले.