| सांगली समाचार वृत्त |
शिराळा - दि. २५ नोव्हेंबर २०२४
नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वत्र महाराष्ट्रात झालेल्या अतितटीच्या व चुरशीच्या सामन्यातील शिराळा विधानसभा मतदार संघातील भाजपा व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सत्यजित देशमुख यांनी बाजी मारून इतिहास घडवला. नागभूमीतील शिराळयाच्या 'नागा'ला वाळव्यातील ४८ गावातील 'वाघां' नी समर्थ साथ केली.
शिराळा-वाळवा हा विधानसभा मतदार संघ दोन तालुक्यात विभागला असून शिराळा-वाळवा तालुक्यातील छोटी-मोठीं ९२ गावे व वाड्याचा आहे. त्यामध्ये वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. हा इतिहास घडवण्याच्या पाठीमागील किंगमेकर वाळवा तालुक्याच्या ४८ गावातील युवा नेते सम्राट महाडिक, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांना प्रामाणिक मदत केली. त्यामुळे शिराळा मतदार संघात परिवर्तन घडले.
शिराळा विधानसभा मतदार संघातील समाविष्ट असणाऱ्या वाळवा तालुक्यातील ४८ गावागावातून सम्राट महाडिक यांनी गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरून तब्बल ४९ हजार मतदान घेऊन आपली ताकद दाखवली होती. त्यानी गेली पाच वर्षे शिराळा मतदार संघात भाजपाच्या देश पातळीवर जनतेच्या हितासाठी राबवल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व योजना पोहचवल्या.
यावेळी ही महाडिक शिराळ्यातून आग्रही होते. पण पक्षाने सत्यजित देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे महाडिक यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. पण पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीनंतर माघार घेवून त्यांनी देशमुख यांना मदत केली. नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख यांना केवळ पाठिंबा देऊन नव्हे, तर निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती. तसेच विधान परिषदेचे माजी मंत्री आ. खोत व त्यांचे चिरंजीव सागर खोत यांचे ही योगदान मोलाचे ठरले.
आ. देशमुख यांना आमदार करण्यासाठी शिराळा तालुक्यातून ज्येष्ठ नेते सुखदेव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती ॲड भगतसिंग नाईक यांनी बिनशर्त पाठिंबा देऊन शिराळा नागभूमीच्या इतिहासात बदल घडवण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील कामेरीचे युवा नेते जयराज पाटील, कुरळपचे भाजपाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष पै. अशोक पाटील तात्या, ऐतवडे खुर्दचे सहकार बोडचि अध्यक्ष प्रताप पाटील या नेत्यांनी आ. देशमुख यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहण्याचा निर्धार केला होता.
विधान परिषदेचे माजी सभापती शिराळा तालुक्याच्या डोंगरी विभागाचे शिल्पकार स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी ३५ वर्षे आमदार व विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळले. एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. गेल्या अनेक वर्षापासून सत्यजित यांचे विधानसभेत जाण्याचे स्वप्न होते. ते अखेर पूर्ण झाले.