| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ नोव्हेंबर २०२४
बुध्दीबळाचा बादशहा भाऊसाहेब पडसलगीकर, ख्यातनाम क्रिकेटपटू विजय हजारे, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, हिंदकेसरी मारुती माने, गणपतराव कांदळकर, भाग्यश्री ठिपसे, स्मृती मानधना यांनी क्रिडा क्षेत्रात सांगलीचे नाव उज्ज्वल केले आहे. असे खेळाडू पुन्हा सांगलीत तयार व्हावेत, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत म्हणून सांगली व परिसराच्या ग्रामीण भागातील चांगल्या खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना घडवण्यासाठी तत्ज्ञ क्रिडा प्रशिक्षकाकडून दर्जेदार प्रशिक्षणाची सोय करण्यासाठी सांगलीत 'क्रिडा संकुल' उभे करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मला आमदार म्हणून निवडून द्यावे. खेळाडूना आरक्षण आणि शासकीय सेवेत नियुक्ती, क्रिडा संघटनाना राजाश्रय, विमा योजना, असोसिएशनच्या स्पर्धा आयोजनासाठी शासकीय निधी इ. कामे करण्यासाठी मी सांगली विधानसभेची महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे. तुमचाच एक खेळाडू म्हणून मला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवा असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले.
छ. शिवाजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर विविध खेळांचा सराव करणाऱ्या खेळाडूशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, 'महिला खेळाडूंना वाव मिळाला पाहिजे, सांगलीत विविध खेळांच्या राज्य व राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन झाले पाहिजे. विजयनगर मध्ये गुलाबराव स्मृती उद्यानात सिंथेटिक ट्रॅक निर्माण कार्य सुरु केले आहे. सांगलीत स्पोर्ट्स क्लब संस्कृती रुजवण्यासाठी माझे खास प्रयत्न राहणार आहेत.यावेळी खेळाडूंनी पृथ्वीराज पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. यावेळी खेळाडूंनी स्टेडियमवर साहित्य ठेवायला खोली उपलब्ध करून द्या, स्टेडियम स्वच्छ ठेवा, खेळाडूंना सर्व सोयी उपलब्ध करून द्या अशा मागण्या केल्या.
सांगलीचे खेळाडू होतकरु व कष्टाळू आहेत. त्यांच्या हातून भारताची सेवा घडणार आहे.त्यांच्या स्वप्नाच्या पंखांना बळ लाभो त्यासाठी माझी शक्ती खर्च करणार असेही पृथ्वीराज म्हणाले. सांगलीतील विविध घटकांना भेटून संवाद करून विकास आराखडा तयार केला आहे.सांगलीत पर्यटन स्थळे, नदी स्वच्छता व शुध्द आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी लक्ष घालणार आहे. सध्याचे आमदार क्रिडा विकासाकडे दुर्लक्ष करतात.ते नवीन काही करतील याची शाश्वती नाही. आता
बदल केलाच पाहिजे. खेळाडूसाठी म. गांधी होस्टेल लवकरच सुरु करण्यात येईल असे ते म्हणाले.
यावेळी पैलवान सुनिल परमणे, विवेक साळुंखे, आयुब बारगीर, रमेश साळुंखे, रुपेश पारेख, इम्रान शेख, राजेंद्र जगदाळे, अरुण झाडबुके, व्ही.डी.कोळी, उन्मेष शहा, अभिजित सुर्यवंशी, आदित्य नाईक, मोहसिन शिकलगार, पै.सुनिल परमणे, विवेक साळुंखे, क्रिडा प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.