| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ ऑक्टोबर २०२४
महायुतीला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी महाआघाडीने कंबर कसली असतानाच महायुतीही पुन्हा एकदा सत्तेचा सोपान चढण्यासाठी सर्वतोपरी ताकद पणाला लावत असून महायुतीचे नेते यासाठी बैठकांवर बैठका घेत आहेत. महायुतीची पहिली बैठक यशस्वी झाल्यानंतर, 288 मतदार संघात उमेदवार निवडीचे आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार पंकजाताई मुंडे या अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या. सोबत होते ते, त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे. बीड जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अपवाद वगळता कायम आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पंकजाताईंनी कोणतीही कसर सोडली नाही. आता अजितदादांची राष्ट्रवादी आणि पंकजाताईंची भाजपा महायुतीतील एक घटक आहेत.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून अजित दादांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. एकेकाचे शरद पवार यांचे कट्टर समर्थ असलेले धनंजय मुंडे आता हा अजितदादांचे कट्टर आहेत. त्यामुळे शरद पवार धनंजय मुंडे यांच्या पराभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. एकीकडे जरांगे पाटील आणि दुसरीकडे शरद पवार यांच्या कात्रीत धनंजय मुंडे यांची उमेदवारी राज्यातील हाय व्होल्टेज पैकी एक आहे.
आणि म्हणूनच या तिन्ही नेत्यांची एकत्रित बैठक काल रात्री साडेअकराच्या दरम्यान देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. भाजपा आणि अजितदादांचे राष्ट्रवादी यांनी पंकजा ताईंना लोकसभेत पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. ही अजित दादा व धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा ताईंना भाऊबीज असल्याची चर्चा त्यावेळी जोरदारपणे झाली होती. आता खा. पंकजाताई या आपल्या चुलत भावासाठी पदर खोचून उभ्या राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.