| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑक्टोबर २०२४
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत सांगलीतून विद्यमान आमदार यांनाच उमेदवारी जाहीर केल्याने, राज्यभरातील भाजपमध्ये निर्माण झालेले बंडखोरीचे लोण सांगलीतही पोहोचले. गेली दहा वर्षे आपण पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी जाहीर केली आहे. माधवनगर येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी आपली बंडखोरी जाहीर केली.
श्री. पप्पू डोंगरे हे गेली अनेक वर्षे सांगली विधानसभा मतदारसंघातील भाविकांना स्वखर्चाने केदारलिंग दर्शनासाठी घेऊन जात असतात. त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. अडल्यानडल्या गरजवंतांना त्यांची मुक्तहस्ताने मदत असते. त्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात श्री. डोंगरे यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
आपल्याला उपमुख्यमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊनही उमेदवारी डावलेली असल्याचे श्री. डोंगरे यांचे म्हणणे आहे. यावेळी आपण कोणत्याही स्थितीत माघार घेणार नसल्याचे श्री. डोंगरे यांनी म्हटले आहे. गेली अनेक महिने ते विधानसभेसाठी तयारी करीत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सांगली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी आहे.
गत लोकसभा निवडणुकीत सांगलीमधून पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. संजयकाका पाटील यांना मिळालेली मते हा चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनला होता. श्री संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीने मूळ भाजपवासींची नाराजी दूर करण्यात आ. सुधीरदादा यांना आलेल्या अपयशामुळेच ही मते भाजपपासून दुरावली. त्यामुळे विधानसभेला सुधीरदादांना उमेदवारी देऊ नये, असे भाजप निष्ठावंतांचे म्हणणे होते व आहे. ही सर्व नाराज मंडळी आपल्या पाठीशी असल्याचा दावाही श्री डोंगरे यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
श्री. पप्पू डोंगरे यांची बंडखोरी रोखण्यासाठी आता कोणती पावले उचलली जातात, याकडे भाजपा निष्ठावंतांचे आणि मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. जर श्री. डोंगरे यांचे मतपरिवर्तन करण्यात पक्षाला अपयश आले तर श्री. सुधीरदादा गाडगीळ यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अवघ्या एकच महिन्यापूर्वी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी निवडणुकीतून निवृत्ती जाहीर केले होती. तरीही पक्षाने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ का घातली ? आणि ती आ. सुधीर दादांनी कशी काय स्वीकारली ? असा असावा केला जात आहे