Sangli Samachar

The Janshakti News

महापालिकेची अनास्था व शिवाजी मंडई परिसराला अतिक्रमणाचा वेढा यामुळे निष्पाप जखमी वृद्धाचा बळी ! जबाबदार कोण ?

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑक्टोबर २०२४
दोन दिवसापूर्वी येथील शिवाजी मंडई परिसरातील अतिक्रमित भाजीविक्रेत्यामुळे एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महापालिकेची अनास्था आणि भाजी विक्रेत्यांची हटवादी भूमिका यामुळे शहरातील नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरातील बहुसंख्य प्रमुख रस्ते, अतिक्रमणांनी वेढले गेले आहेत. येथून प्रवास करताना वाहनधारकांना व पादचाऱ्यांना अडथळ्यांची मोठी शर्यत करावी लागते. सांगली शहरातील शिवाजी मंडई परिसराप्रमाणेच दत्त-मारुती रोड, मेन रोड, मित्र मंडळ चौकातील महापालिकेच्या नाकासमोरच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मोठे दिव्यच असते. या ठिकाणीही कधी कुणाला जीवास मुकावे लागेल हे सांगता येणे कठीण आहे. सराफ कट्टा, गणपती पेठ, रिमांडहोम पासून वालचंद कॉलेजपर्यंत मिरजेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फळ व विविध वस्तूंचे स्टॉल वाहतूकदारांच्या जिवीतस धोकादायक ठरत आहेत. काही दिवसापूर्वीच या मार्गावरील एका फळ विक्रेत्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. 

सांगली प्रमाणेच मिरजेतही अनेक प्रमुख मार्ग अतिक्रमणांनी व्यापले आहेत. छत्रपती शिवाजी मार्ग, महापालिका प्रशासकीय इमारत परिसर, सराफ बझार, इत्यादी भागातून येण्याजाणाऱ्या वाहने व पादचाऱ्यांना अडचणींशी सामना करावा लागत आहे.


महापालिकेचा अतिक्रमण विभाग तात्पुरती कारवाई करून आपली कर्तव्यनिष्ठा (?) दाखवत असतो. महापालिका क्षेत्रात अतिक्रमणातील जप्त केलेले साहित्य घेऊन अतिक्रमण विभागाचा ट्रक पुढे गेला की पुन्हा या ठिकाणी नव्याने अतिक्रमण होत असते. त्यामुळे अतिक्रमण विभाग व भाजीविक्रेत्यांची मिलीभगत असल्याचा आरोप होतो.

नुकताच महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याबाबत सविस्तर माहितीही प्रसिद्ध झाली होती. मात्र प्रिंट मीडियातील पेपरवरील शाई वाळण्यापूर्वी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील आवाज विरण्यापूर्वीच शिवाजी मंडई परिसरातील अतिक्रमणामुळे एका वृद्ध निष्पाप जीवाला मुकावे लागले आहे. आता या अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला असला तरी, नेमका दोष कोणाचा ? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.