| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. १३ ऑक्टोबर २०२४
सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी गट एकमेकाविरुद्ध उभे ठाकले आहेत. एकाला ओबीसी मधूनच सरसकट आरक्षण हवे आहे तर त्याला ओबीसींचा विरोध आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही ताकतीचा नेमका फायदा कोणाला आणि तोटा कोणाला ? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या खा. पंकजाताई मुंडे आणि मराठा आंदोलकांचे नेते जरांगे पाटील या दोघांचीही मराठवाड्यावर चांगलीच पकड आहे. मध्यंतरी जरांगे पाटील यांनी केलेल्या महाराष्ट्र दौऱ्याला मराठा समाजाचा अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक सभेला लाखाहून अधिक जनसमुदाय एकवटला होता. त्यामुळे मराठा समाजाची एकवटलेली ही ताकद महायुती आणि महाआघाडी दोघांनाही आव्हान देणारी आहे. अर्थात जरांगे पाटलांचे आंदोलन हे शरद पवार पुरस्कृत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
तर दुसरीकडे कधी नव्हे ते ओबीसी नेते एकाच व्यासपीठावर दिसून येत असून, त्यांनीही मराठा समाजाच्या आंदोलकांसमोर आव्हान उभे केले आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये ही मागणी विविध मेळाव्यातून करण्यात येत आहे. याला आता मुंडे भाऊ बहिणींची साथ मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नेते विद्यमान मंत्री धनंजय मुंडे हे पक्षाच्या फाटाफुटीआधी भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात उभे होते. तर त्याचवेळी ओबीसी मधील प्रत्येक नेत्याचा स्वतंत्र गट होता व आहे. परंतु मराठा आंदोलनामुळे या सर्व नेत्यांना आता आपली ताकद एकवटण्याची गरज लक्षात आल्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला ठेवून हे नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. परंतु समाज म्हणून ही ताकद ते महायुती की महाआघाडी यापैकी कोणाच्या मागे उभे करणार असा सवाल आहे.
काल दसऱ्याच्या निमित्ताने जरांगे पाटील यांचा एक, तर मुंडे भाऊ बहिणींचा यांचा एक असे दोन वेगवेगळे मेळावे संपन्न झाले. दोन्ही समाजाने आपली ताकद दाखवण्यासाठी लाखा लाखांचा समुदाय या मेळाव्यासाठी एकत्रित आणला होता. पण चर्चा आहे ती, कोणाच्या मेळाव्याला अधिक गर्दी होती ? मराठा आणि ओबीसी या दोन मोठ्या शक्ती भगवानगडावर एकत्र आल्यामुळे पोलीस प्रशासनावरही ताण होता. मात्र या दोन्ही मेळाव्यात कोणतीही अनुचित घटना न घडल्याने व दोन्ही मेळावे मोठी गर्दी असूनही शिस्तीत पार पडली. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुस्कारा सोडला. मात्र आता प्रश्नचिन्ह उभे टाकले आहे ते शिंदे सरकार समोर...
एकाला खुश करावे तर दुसरा मोठा समाज नाराज होतो हे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला लक्षात आले आहे. मराठा फॅक्टरचा फटका या लोकसभा निवडणुकीत महायुतीला, विशेषतः भाजपाला बसला होता. आणि म्हणूनच मराठ्यांच्या आंदोलनाने तोंड पोळल्याने शिंदे सरकार म्हणण्यापेक्षा भाजपा ताकही फुंकून पिण्याची दक्षता घेत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता, मराठ्यांना खुश करण्यासाठी महायुती मधला मार्ग काढण्याच्या तयारीत आहे. कधीही आचारसंहिता लागू होण्याचे चिन्हे असल्याने, आगामी दोन-तीन दिवस महायुतीसाठी महत्वपूर्ण आहेत. कारण आचारसंहिता लागू झाल्यानंतर याबाबत महायुतीला निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे 'भगवान गडावरील मेळावा आणि सरकार पुढील आव्हान' ही चर्चा सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू आहे.