Sangli Samachar

The Janshakti News

मिरजेत महाआघाडीत बिघाडी, उद्धवसेनेकडून तानाजी सातपुते, काँग्रेसकडून प्रा. मोहन वनखंडे सर अर्ज दाखल करणार !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २९ ऑक्टोबर २०२
राज्यात विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर महाआघाडी आणि महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर सर्व राज्यात दोन्ही आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडीचे चित्र दिसून येत आहे. भाजप असो की काँग्रेस दोन्ही पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त करीत अनेक ठिकाणी मोठे शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर मिरजेतही महाआघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. ज्या मिरजेत गत लोकसभा निवडणुकीत ठाकरे शिवसेनेने पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी महाआघाडीला विश्वासात न घेता जाहीर केली होती, त्याच मिरजेत पुन्हा याचीच पुनरावृत्ती झाली आहे.

ठाकरे शिवसेनेने येथून निष्ठावंत कार्यकर्ते तानाजी सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली असून त्याला एबी फॉर्म ही दिला आहे. त्यामुळे सातपुते यांनी काल मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. सातपुते हे गेली अनेक वर्षे (एकत्रित)शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत पसंत केले होते. याचे फळ म्हणून सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


दरम्यान भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र येथून पुन्हा एकदा भाजपने विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याच नावावर मोहर उमटवली. गेले काही दिवस खाडे आणि वनखंडे यांच्यात नाराजीचे सूर उमटले होते. भाजप नेत्यांनी या दोघांमध्ये पॅचअपचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आणि नाराज झालेल्या प्रा. वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

काँग्रेस पक्षाला येथून डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा होता. पक्षाकडून सी आर सांगलीकर हेही इच्छुक होते. परंतु मतदारसंघातील प्रा. वनखंडे यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचे असलेले मोहोळ भाजी मारून गेले. आणि ठाकरे शिवसेनेप्रमाणेच प्रा. मोहन वानखंडे यांना काँग्रेसचे उमेदवारी जाहीर झाली आहे.

आता या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते, की लोकसभेप्रमाणेच येथे प्रा. वनखंडे यांचे उमेदवारी बंडखोरी मानून आघाडीत बिघाडी होते, याबाबतचे चित्र पुढील दोन दिवसात स्पष्ट होईल.