| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑक्टोबर २०२४
एकीकडे भाजपच्या सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करून आघाडी घेतली असतानाच, काँग्रेसचे दोन्ही इच्छुक उमेदवार पृथ्वीराजबाबा पाटील व श्रीमती जयश्री ताई पाटील अजूनही गॅसवरच आहेत. दोघांनीही उमेदवारी बाबत आपला हट्ट कायम ठेवला असून, एकाला उमेदवारी दिली तर दुसरा बंडखोरी करणार हे निश्चित असल्याने, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा नागरिकांनाही काँग्रेसच्या उमेदवारीबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली विधानसभा मतदारसंघातून सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील या दोघांनीही हक्क सांगितला आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील या दोघांनीही श्रीमती जयश्रीताई पाटील यांना सबुरीने घेण्याचा दिलेला सल्ला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नाकारला आहे. त्याच वेळी मेरिटचा मुद्दा उपस्थित करीत पृथ्वीराजबाबा पाटील यांनी गेल्या पाच वर्षाच्या कामगिरीचा आढावा या दोन नेत्यांना वाचून दाखवला. आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्यालाच उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला.
जिल्हा पातळीवर दोन्ही इच्छुक उमेदवारांमध्ये समजवता होत नसल्यामुळे आता निर्णयाचा चेंडू राज्य पातळीवरील नेत्यांच्या कोर्टात पाठवण्यात आला आहे. पृथ्वीराज बाबा पाटील हे सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी सुरू ठेवले आहे. जिल्ह्यातील नेत्यांसह राज्य पातळीवरील नेते गेल्या पाच वर्षातील आपल्या कामगिरीचा निश्चित विचार करून आपल्यालाच उमेदवारी देतील असा विश्वास भरपूर आहे बाबा पाटील यांना आहे.
काल श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या पत्रकारांशी संवाद साधताना, आणि संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडून आपल्या नावाची घोषणा होणार असून आपण जिल्ह्यातील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी सांगली विधानसभा मतदारसंघातून महिलेला संधी देण्याचा निर्णय काँग्रेसकडून घेतला असल्याने, या जागेवर आपला हक्क असल्याचा दावा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी केला आहे.
या दोन्ही उमेदवारांच्या दाव्या-प्रतिदाव्याने मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याच वेळी पृथ्वीराजबाबा पाटील व श्रीमती जयश्रीताई पाटील या दोन्ही इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांना का उमेदवारी मिळायला हवी, याबाबत प्रसार माध्यमांसमोर बाजू मांडली आहे.
या पार्श्वभूमीवर सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेमके कोणाला ए बी फॉर्म देणार आणि पक्षातर्फे कोण निवडणूक रिंगणात उतरणार ? याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह नागरिकांना लागून राहिली आहे.