| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ६ ऑक्टोबर २०२४
प्रा. मोहन व्हनखंडे हे एकेकाचे आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे उजवे हात. त्यांचा सारा कारभार तेच सांभाळायचे. जतमध्ये प्रथमतः आमदार म्हणून निवडून आणण्यात आणि त्यानंतर मिरजेत खाडे भाऊंची हॅट्रिक साधण्यात व्हनखंडे यांचा मोठा हात. परंतु आता त्यांचा हात सोडून प्रा. मोहन व्हनखंडे यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला असून, आपल्या राजकीय गुरूच्या विरोधातच ते मिरज विधानसभा निवडणुकीत समोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे मिरज विधानसभा मतदार संघ हा चर्चेचा विषय बनला आहे.
भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्रा. मोहन व्हनखंडे यांनी भाजपचे कमळ खाली ठेवले असून काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. काल कोल्हापुरात संपन्न झालेल्या संविधान संमेलनात काँग्रेसच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रा. व्हनखंडे कोणत्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार याला अर्धविराम लागला आहे. अर्धविराम अशासाठी, ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते मिरज विधानसभा निवडणूक लढू इच्छितात, तेथे इच्छुकांची आधीच भाऊ गर्दी आहे. त्यामुळे काँग्रेस कडून त्यांची उमेदवारी पक्की मानली जात असली तरी, त्यांना व काँग्रेस पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नईला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, खा. विशाल पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, जितेश कदम यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांनी प्रा. मोहन व्हनखंडे यांचे पक्षात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संविधान संमेलनामध्ये सहभाग ही घेतला.
प्रा. मोहन व्हनखंडे गेली अनेक वर्ष भाजपा मध्ये सक्रिय आहेत. विद्यामंदिर प्रशालेत प्राध्यापक म्हणून सेवा बजावत असतानाच त्यांनी 2004 मध्ये जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी पार पडली. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या मिरज विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त करून दिले. एका अर्थाने ते आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे उजवे हात मानले जातात. परंतु प्रत्येकालाच राजकारणात काम करीत असताना मोठमोठ्या पदांची शिडी चढण्याची मनोकामना असते. तशीच ती प्रा. मोहन व्हनखंडे यांनाही खोटी व आहे.गेले काही दिवस प्रा. मोहन व्हनखंडे महायुतीच्या मार्फत उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. परंतु तेथे शिष्यापेक्षा गुरुच अर्थात प्रा. मोहन व्हनखंडे यांच्यापेक्षा आ. सुरेशभाऊ खाडे वरचढ ठरले. मिरज विधानसभा मतदारसंघात त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे प्रा. मोहन व्हनखंडे यांना भाजपामधून संधी मिळणे दुरापास्त झाले होते. तेव्हा त्यांनी जनस्वराज्याच्या माध्यमातूनही प्रयत्न करून पाहिला. परंतु तेथेही त्यांची डाळ शिजली नाही. आणि म्हणूनच त्यांनी इतके वर्ष भाजपामधून विविध पदावर कार्य करीत असतानाच सर्व पदांचा राजीनामा देऊन काँग्रेसच्या गोटात सामील झाले. आता महाआघाडी कडून त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.
2004 ते 2024 या वीस वर्षात त्यांचा मोठा जनसंपर्क निर्माण झाला आहे. आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे सारे व्यवहार तेच सांभाळायचे. या माध्यमातूनही त्यांची शक्ती वाढली आहे. विधानसभा निवडणुकी बरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. त्यांच्या पत्नी सौ अनिता व्हनकंडे या मिरजेतून महापालिकेत भाजपच्या प्रतिनिधीत्व करीत होत्या. महापालिकेत भाजपच्या समाज कल्याण सभापती म्हणून कार्यरत असताना सुमारे 78 कोटी रुपयांचा विकास निधी त्यांनी महापालिकेच्या क्षेत्रासाठी मिळवून दिला आहे. ही सुद्धा प्रा. मोहन व्हनखंडे यांच्यासाठी महत्त्वाची घडामोड मानली जाते.
गेल्या काही दिवसात आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे व प्रा. मोहन व्हनखंडे राजकीय इच्छाशक्ती वरून दुरावा निर्माण झाला. दिवसे दिवस ही दरी वाढत गेली. आणि त्यातूनच प्रा. मोहन व्हनखंडे हे आ. डॉ. खाडे यांच्यापासून दूर झाले. भाजपात असताना या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आता या दोघांमध्ये कोणाची ताकद सरस ठरते, हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत दे दणादण... आणि दे धक्का... असे प्रकार पहावयास मिळणार आहेत.