| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ ऑक्टोबर २०२४
मराठी पत्रकार परिषदेचे संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद व शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री ग. गो. जाधव पत्रकार अभ्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन करणारी कार्यशाळा काल मोठ्या उत्साहात आणि जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आलेल्या पत्रकारांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे कार्याध्यक्ष सनी शिंदे, प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषदेचे मार्गदर्शक शिवराज काटकर, दैनिक लोकमतचे आवृत्ती प्रमुख हणमंत पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, हे विशेष करून उपस्थित होते.
यावेळी सनी शिंदे यांनी आपले अनुभव कथन करून डिजिटल मीडिया प्रमुख किंवा पत्रकार म्हणून काम करताना प्रामाणिकपणाला खूप महत्त्व आहे. दुर्दैवाने यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना शासकीय कार्यालयात अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्याचप्रमाणे इतर माध्यमांकडून दुय्यम वागणूक दिली जाते, अशी खंत व्यक्त केली.
यावेळी मार्गदर्शन करताना डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, डिजिटल माध्यमातील पत्रकारांनी शोध वार्ता करून नेहमी वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा. आपली बदनामी होणार नाही यासाठी नेहमीच दक्ष राहायला हवे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लोकमतचे आवृत्ती प्रमुख हणमंत पाटील म्हणाले की, पत्रकारांजवळ संयम आणि प्रामाणिकपणा असण्याबरोबरच समोरच्या व्यक्तीला गरजेचे आहे. सध्या डिजिटल युग असून या पुढील काळात डिजिटल माध्यमातून प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन हे यावेळी पाटील यांनी केले.
'डिजिटल माध्यमिक व कायदे' याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांनी सखोल मार्गदर्शन केले. चांगल्या पत्रकारितेसाठी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे तरच त्यांची पत्रकारिता यशस्वी होईल. यासाठी कायद्याचे ज्ञान अवगत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यशाळेचा प्रारंभ रोपट्यास पाणी घालून करण्यात आला. सुरुवातीस उपस्थितांचे स्वागत डिजिटल मीडियाचे प्रवेश कार्यकारणी सदस्य तानाजीराजे जाधव यांनी केले तर प्रास्ताविक शिवराज काटकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता येथील कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनपर भाषण झाले. यावेळी त्यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शेवटी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष (शहर) श्री. कुलदीप देवकुळे यांनी उपस्थित मान्यवरांसह पत्रकारांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल मीडिया परिषद सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मोहन राजमाने यांनी केले. तर कार्यक्रमाचे नेटके नियोजन अभिजीत शिंदे, संजय माळी, मोहसीन मुजावर, प्रकाश सूर्यवंशी, अक्रम शेख, आदींनी केले. उपस्थित पत्रकारांनी सर्वच मान्यवरांच्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले.