Sangli Samachar

The Janshakti News

कृष्णा-पंचगंगा नदीच्या महापुराबद्दल नोव्हेंबरनंतर केंद्रीय जल आयोगासोबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन - सौ. सुप्रियाताई सुळे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ सप्टेंबर २०२४
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे नुकतेच राज्यव्यापी विचार मंथन व निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद प्रमुख मार्गदर्शक श्री. शरद‌चंद्र पवार व निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत सर्व राज्यभरातून आलेल्या सामाजिक संस्थांच्या सहभागातून यशस्वीपणे पार पडली. 

सांगली येथील कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. या परिषदेत कृष्णा महापूर नियंत्रण कृती-समितीचा आवाज घुमला. समितीने मांडलेले सांगलीकरांचे प्रश्न व त्यावर उपाय योजना सर्वांनी समजावून घेतल्या. यावेळी कृष्णा महापूर नियोजन व नियंत्रणांवरचा प्रस्ताव समितीचे ज्येष्ठ अभ्यासक श्री. विजयकुमार दिवाण व श्री. प्र‌भाकर केंगार यांनी सादर केला. या विषयाचे गांभीर्य समजावून घेऊन नोव्हेंबरनंतर केंद्रीय जल आयोगासोबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन दिल्ली येथे केंद्रीय जल आयोग मंत्रालयात करणार असल्याची ग्वाही आयोजकांनी दिली. 
    
मार्गदर्शनपर भाषणात बोलताना मा. शरदचंद्रजी पवार यांनी, सद्यस्थितीत स्वयंसेवी संस्था या कार्यरत राहणे अत्यंत गरजेचे आहे असे नमूद केले. स्वयंसेवी संस्था जो अभ्यास करतात, त्याचा राज्यशासनास उप‌योग तर होतोच व त्यांच्याकडून आलेल्या अहवालाचा योग्य तो उचित असा सामान्य नागरिकाच्या विकासासाठी उपयोग करणे देखील गरजेचे आहे. 


कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे समन्वयक मा. सर्जेराव पाटील यांनी सांगली शहरासाठी चांदोली धरणातून थेट पाइपलाईनव्दारे पाणी आणण्याबाबतचा अहवाल दिला. 

तसेच सांगली येथील कित्येक वर्षे अनुत्तरित राहिलेल्या शामरावनगरच्या नागरिकांचा पाणी निचरा होण्याबाबत श्री. सुयोग हावळ यांनी भागातील नागरिकांच्या अडचणी बाबतचे निवेदन समिती मार्फत देण्यात आले. त्यावर नोव्हेंबर नंतर सांगली महसूल विभागात बैठक घेण्याचे निश्चित केले असून, या बैठकीत सांगली, कोल्हापूरला भेडसावत असलेले प्रश्न व उपाययोजना समजून घेण्यासाठी व शुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत चर्चा होणार आहे

महाराष्ट्रातील सात महसूल विभागात स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांच्या बैठकी घेणार असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी घोषित केले. यामुळे या भागातील नागरी अडचणी दूर होण्यास उपयोग होणार असल्याची चर्चा परिषदेनंतर उपस्थितामध्ये होत होती. श्री शरदचंद्र पवार व सौ. सुप्रियाताई सुळे यांनी याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे.