Sangli Samachar

The Janshakti News

राहुल गांधी यांचे भाजपावर शरसंधान, जातीय जनगणना, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेमागे भाजपा कनेक्शन !


| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. ६ सप्टेंबर २०२४
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधत, जवळपास दोन लाख उपस्थितांच्या साक्षीने आगामी विधानसभा निवडणुकीचे जणू रणशिंगच फुंकले आहे. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवरून टिकेचा भडीमार केला. भाजपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट संघाच्या अनुनभवी कार्यकर्त्याला दिल्यामुळे, श्री दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनातही हाच कित्ता गिरविला जात असल्याचा आरोप करून ते म्हणाले की, तुम्ही संघाचे असाल तरच तुम्हाला नोकरी, नसाल तर तुम्हाला संधी दिली जाणार नाही असा छुपा अजेंडा भाजपा राबवत आहे. 

जातीय जनगणना करण्याची भूमिका ही आता भाजपा-संघाने बदललेली आहे. यापूर्वी ते जात जनगणना करण्याची गरज काय असा सवाल करीत होते. परंतु आता ही अशी जनगणना करण्यास हरकत नाही असे सांगत आहेत. आम्ही पूर्वीपासून जात जनगणना करण्यासाठी आग्रही आहोत. लोकसभेतही हेच आम्ही ठणकावून सांगितले आहे. त्याचप्रमाणे देशात कोणाच्या तिजोरीत किती धन संपत्ती आहे याचाही एक्स-रे काढणार आहोत. त्याला भाजपाचा का विरोध आहे ? असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी केला.


आम्ही सत्तेत तळागाळातील कार्यकर्त्यांना सहभागी करून घेणार आहोत. त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीपासून झाली असून, आणि तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेला हे दिसून येईल असेही राहुल गांधी यांनी सांगितले. संपूर्ण केंद्राची सत्ता मोदी-शहा या दोन व्यक्तींच्याच हाती एकवटली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून अदानी-अंबानी या दोन व्यक्ती ही सत्ता चालवत आहेत. असा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात बोलताना केला.

केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार केवळ श्रीमंतांचे सरकार आहे. त्यांनी बँकांची तिजोरी केवळ धनिकांसाठीच उघडलेली आहे. आम्ही शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी कर्ज माफ केले होते. परंतु मोदी सरकारने अवघ्या 22 उद्योजकांचे 16 लाख कोटी कर्ज माफ केले आहे. यावरून गोरगरिबांचे कैवारी कोण, हे जनतेच्या लक्षात आले आहे असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला राज्यात न्यायाची सत्ता आणायचे आहे. स्थानिकांच्या हाताला काम द्यायचे आहे. येथील बाहेरचा कंत्राटदार जगविला जाणार नाही तर स्थानिक बेरोजगारीला बळ देण्याचे काम आम्ही करणार आहोत. असेही राहुल गांधी यांनी सांगितले.