Sangli Samachar

The Janshakti News

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी सहकार्य करावे - मा .शुभम गुप्ता, आयुक्त यांचे आवाहन


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ सप्टेंबर २०२४
उद्यापासून सुरू होत असणाऱ्या श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे. महापालिकेच्या तयारीचा आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी आढावा घेत, अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष आगमन आणि विसर्जन मार्गाची पाहणी केली. तसेच खड्डेमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवत विसर्जन व आगमन मार्गावर एकीही खड्डा दिसणार नाही याबाबतच्या सूचना प्रशासनाला केल्या. तसेच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन ही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व गणेशभक्त नागरिकांना केले आहे.

आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा अधिकाऱ्यांच्या समवेत सांगलीतील श्री गणपती आगमन मार्ग तसेच विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी संपूर्ण बाजारपेठेची पाहणी करीत आयुक्त गुप्ता यांनी अधिकारी यांना मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याबाबतच्या सूचना केल्या. याचबरोबर आयुक्त शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांसमवेत सरकारी घाटावर जात तेथील तयारीची पाहणी केली.


यावेळी सरकारी घाटावर सुरक्षा बॅरेकेटिंग, विजेची व आवश्यक लाईट ची सोय, २४ तास सुरक्षा कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या. तसेच सरकारी घाटावर विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी गर्दी करू नये, लहान मुलांना सोबत आणणे टाळावे असे आवाहन आयुक्त शुभ गुप्ता यांनी केले आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खबरदारी म्हणून महापालिकेकडून विसर्जनाची सोय करण्यात आली असून महापालिकेच्या बोटीच्या माध्यमातून गणेश मुर्त्यांचे विसर्जन मोफतपणे केलं जाईल अशा सूचनाही आयुक्त गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच नागरिकांनी सुद्धा नदीपात्रामध्ये विसर्जनासाठी न उतरता महापालिकेच्या बोटिंमध्ये आपल्या मुर्त्या द्याव्यात त्याचे नदीपात्रात विसर्जन महापालिका प्रशासन करेल असे आवाहन सुद्धा आयुक्त गुप्ता यांनी केले आहे.

याचबरोबर महापालिका क्षेत्रात ५० ठिकाणी तात्पुरते विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत याचाही वापर नागरिकांनी करून गणेश मूर्तीचे विसर्जन कुंडामध्ये विसर्जन करावे, त्या मुर्त्या कृष्णा नदी पात्रामध्ये महापालिकेकडून विसर्जित केल्या जातील असेही आयुक्त गुप्ता यांनी यावेळी सांगितले. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आनंदामध्ये साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांनी महापालिका प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहनही आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.

दरम्यान सरकारी घाटावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेत महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आणि करण्यात येत असलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. या पाहणी वेळी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, नगर अभियंता आप्पा अलकुडे, उपअभियंता ऋतुराज यादव, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक बारगीर, स्वच्छता निरीक्षक प्रणील माने, धनंजय कांबळे , वैभव कुदळे, किशोर काळे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.