Sangli Samachar

The Janshakti News

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या-नव्यांचा मेळ घालीत श्री. विनोद तावडे यांचे सांगलीत बेरजेचे राजकारण !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तारूढ होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. गतकाळात महायुतीकडून ज्या चुका झाल्या आहेत, त्यामुळे मतदारांच्या मनामध्ये अजूनही सुप्त राग दिसून आहे. विशेषतः ज्या पद्धतीने महाआघाडीकडून सत्ता हस्तगत केली आणि त्यानंतर ज्यांच्यावर करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्या अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेतले. यावरून मतदारांसह भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात हा राग तेवत आहे.

या पार्श्वभूमीवर मतदारांच्या या रागावर फुंकर घालण्यासाठी महायुती सरकारकडून विविध लोकप्रिय योजना राबवण्याबरोबरच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आणि याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव श्री. विनोद तावडे सध्या सांगली जिल्ह्यात बेरजेचे राजकारणाच्या त मूडमध्ये आहेत.

श्री. विनोद तावडे यांनी नुकताच सांगली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी सांगली, मिरजेतील भाजपामध्ये असलेली दुफळी मिटवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. सांगली व मिरजेच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही रिस्क घेण्यास भाजपा तयार नाही. सध्या या दोन्ही मतदारसंघात उमेदवारीसाठी पक्षांतर्गत संघर्ष दिसून येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मिरजेचे आमदार ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याबाबत तालुक्यातील भाजपा नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले प्रा. मोहन व्हनखंडे यांनी बंडखोरी करीत ना. यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात भाजपामध्ये एक मोठा गट उभा ठाकला होता, त्यामुळे येथील ही नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान श्री तावडे यांच्यासमोर आहे.


मिरजेप्रमाणे सांगलीतही आ. सुधीरदादा गाडगीळ हे हॅट्रिकच्या तयारीत असताना, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जोर लावला आहे. आ. गाडगीळ यांनी गेल्या दोन टर्ममध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे केली आहेत. मात्र त्याची आवश्यक ती प्रसिद्धी न केल्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबाबत संभ्रमावस्था आहे. मिरजेप्रमाणे सांगलीतही गत लोकसभा निवडणुकीत भाजपचा टक्का घसरण्याचे दिसून आले आहे. आणि हाच मुद्दा उचलून धरीत, डोंगरेंसह आ. सुधीरदादांच्या विरोधातील एक गट आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

सांगली, मिरज वगळता सर्वच मतदारसंघात भाजपा अंतर्गत सुप्त संघर्ष दिसून येत आहे. येथील सर्व मदार भाजपाने आयात केलेल्या नेत्यांवर अवलंबून आहे. आणि नेहमीच त्यांची भूमिका ही पक्षीय पातळीपेक्षा स्थानिक मुद्द्यावर महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका भाजपला बसू नये, यासाठी श्री विनोद तावडे यांना जिल्ह्यात मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत.