Sangli Samachar

The Janshakti News

स्व. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थिती बाबत आ. डॉ. विश्वजीत कदम यांचा खुलासा !


| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. ५ सप्टेंबर २०२४
स्व. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या कडेगाव येथील लोकतीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लोकसभा विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर महत्त्वपूर्ण नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. परंतु येथे उपस्थित नागरिकांसह क्षेत्रात चर्चा रंगली आहे ती, उद्धव ठाकरे निमंत्रण असूनही या कार्यक्रमास का आले नाहीत ?


याबाबत पत्रकारांनी माजी मंत्री व जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेतृत्व आ. डॉ. विश्वजीत कदम यांना छेडले असता, मा. उद्धव ठाकरे हे कुठल्याही नाराजीमुळे नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे येऊ शकले नाहीत. पंधरा दिवसांपूर्वीच मी स्वतः त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मातोश्री बंगल्यावर गेलो होतो, असे सांगून ते म्हणाले की, जवळजवळ अर्धा तास आमची विविध विषयावर चर्चा झाली. परंतु त्यांच्या बोलण्यात कुठलीही नाराजी दिसून आली नाही. त्यांचे आशीर्वाद व शुभेच्छा कायमच आमच्या सोबत आहेत. असेही डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले. त्यामुळे कालपासून उद्योग ठाकरे यांच्या अनुपस्थिती बाबत चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे.