Sangli Samachar

The Janshakti News

वेदनांतील सुख-आनंद ! (✒️ राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १ सप्टेंबर २०२४

वेदनांमध्येही आनंद, सुख असते ! थोडे विचित्र वाटते नाही कां ? कांही तरीच काय, वेदना होताना कधीतरी सुख वाटेल कां ? पण तो जगाचा नियंता, निर्माता आहे ना, त्याच्या कृपेने हा चमत्कार आजवर अनेकदा घडून आला आहे. या क्षणाला घडत आहे. आणि जो पर्यंत हे विश्व आहे, तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक क्षणाला तो घडत राहाणार आहे. अशी ही कोणती ईश्वरी कृपा आहे, हा कोणता दैवी चमत्कार आहे जो वेदनांमध्येही सुख देतो ?

‘द प्रोफेट’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व तत्वज्ञ खलिल गिब्रान यांची एक कथा आहे. एकदा एक शिंपला आपल्या शेजारच्या शिंपल्याला म्हणाला,

“माझ्या पोटात कांहीतरी जड आणि वाटोळे आहे. त्यामुळे माझ्या पोटात फार वेदना आहेत. त्याचा मला खूप त्रास होत आहे.”

दुसरा शिंपला मोठ्या ऐटीने म्हणाला,
“भगवंताची आणि सागराची कृपा आहे. माझ्या पोटात कांहीच नाही. कसलीही वेदना नाही. आतून बाहेरून मी अगदी निरोगी आहे.”

त्या वेळी तेथून बाजूने एक खेकडा चालला होता. त्यांने त्या दोन शिंपल्यांचे आपापसातील बोलणे ऐकले आणि तो त्या आतून-बाहेरून बऱ्या असलेल्या शिंपल्याला म्हणाला,

“होय, तुला कांहींही झाले नाही. तू बरा आहेस हे खरं, पण तुझी शेजारील शिंपला जे दुःख सहन करीत आहे ते एक अप्रतिम आणि अमौलिक मोती आहे. त्याच्या इतके सुंदर मोती क्वचितच दुसरीकडे मिळेल.”


खलील गिब्रानच्या कथेच्या संदेशाशी जुळणा-या अर्थाचे एक गाणे ‘मैं भी लडकी हूँ’ या सिनेमात आहे. सिनेमा नायकाला आपली पत्नी गर्भवती असल्याचे ज्यावेळी समजते त्यावेळी तो व त्याची पत्नी आनंदाने गाणे गातात. 

“चन्दा से होगा वो प्यारा, फूलों से होगा वो न्यारा 
नाचेगा आँगन में छम-छम, नन्हा-सा मुन्ना हमारा 
खिलती हो जैसे कली सी, होगी ज़बाँ तोतली सी
पापा, ओ मामा, ओ बबा, पकलेंगे हम चाँद-ताला
अब तक छुपा है वो ऐसे, सीपी में मोतो हो जैसे  
परियों कि नगरी से चलकर, आता ही होगा दुलारा” (सीपी म्हणजे शिंपला)

खलिल गिब्रानला शिंपला व त्यामध्ये पावसाच्या पाण्याचा थेंब जाऊन तयार होणाऱ्या मोत्याची कथा आणि “चन्दा से होगा वो प्यारा” या गाण्यात आईच्या गर्भातील लहान जीवाला दिलेली मोत्याची उपमा एक खुप छान संदेश देते. ‘सुंदर, चांगले निमार्ण होताना वेदना होतात पण त्या आनंद, सुख देणा-या असतात’.     

पावसाच्या पाण्याचा एक थेंब शिंपल्यात जाऊन सुंदर, चमकदार मोती बनून कांही दिवसांनी ज्याप्रमाणे बाहेर येतो, त्याप्रमाणे एका आईच्या गर्भामध्ये वाढत असलेला जीव निसर्ग नियमांप्रमाणे एक दिवस गर्भाशयाच्या बाहेर येतो. गर्भ पोटात असतांना, त्याचे ओझे वाहत असतांना आणि गर्भाशयातून तो बाहेर येतो, त्यवेळी आईला प्रचंड वेदना होत असतात. परंतु त्या सहन करून तो जीव ज्यावेळी गर्भाशयातून बाहेर येऊन आपला पहिला हुंकार देतो, त्यावेळी ती माऊली आपल्या सर्व वेदना, दुःख विसरते.

त्या जीवाला मग तो कसाही दिसत असला तरी मायेने, ममतेने जवळ घेते, कुरवाळते, आपल्या छातीशी कवटाळते. त्या छोट्या जीवासाठी आईचे उंचबळून आलेले प्रेम, माया, ममता तिच्या स्तनांतून दुधाच्या रूपाने बाहेर येऊन अमृतधारांचा वर्षाव त्या लहान जीवावर करतात.  
गर्भ बाहेर येतांना होणाऱ्या वेदना, तो बाहेर आल्यानंतर होणारा आनंद, ते निखळ विशुद्ध प्रेम, माया, ममता एक आईच जाणे. वर्णन करायला माझे शब्द अपुरे आहेत.
 
आईची ही वेदना, ममता, माया पाहिली, आठवली की एक विचार नेहमी माझ्या मनामध्ये घोंगावतो. ‘देव निःपक्षपाती आहे. आपल्या सर्व मुलांवर तो समान प्रेम करतो. हे जर खरे असेल, तर गर्भधारणा, गर्भावस्था, व एका जीवाला जन्म घेणे यातील वेदना, आनंद, सुख भगवंताने फक्त स्त्रीयांपुरतेच कां बरं मर्यादित ठेवले आहे, वेदनांतील या सुखापासुन पुरूषांना कां बरं वंचित केले असावे ? परंतु मी अज्ञ, त्यामुळे माझ्या मनात असा प्रश्न उभा राहातो, कारण त्याची लीला तोच जाणे हेच खरं.’ 

- अंतरंगात उमटलेले हे बोल पूर्ण. 

संदर्भः गाणेः चंदा से होगा वो प्यारा, चित्रपटः मैं भी लडकी हूँ, संगीतकारःचित्रगुप्त, गीतकारः राजिन्दर क्रृष्ण, गायकः लता मंगेशकर, पी.बी.श्रीनिवास