| सांगली समाचार वृत्त |
तिरुपती - दि. २३ सप्टेंबर २०२४
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूत तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर देशभरातील वातावरण तापले आहे. यावरूनच आता सद्गुरु वासूदेव यांचं वक्तव्यही चर्चेत आहे. तिरुपतीच्या लाडूत गायीचं मांस असल्याचा प्रकार किळसवाणा असल्याचं सद्गुरु म्हणाले आहेत. आता हिंदू मंदिरे सरकारी प्रशासनाने नव्हे तर हिंदू भक्तांनी चालवायला हवी असंही ते म्हणालेत.
गोमांस चरबी आढळणे हे किळसवाणे असून भक्त ग्रहण करत असलेल्या मंदिराच्या प्रसादात गोमांस चरबी आढळणे हे किळस येण्यापलिकडचे आहे. त्यामुळे मंदिरांची देखभाल सरकारी प्रशासनाने नव्हे तर भक्तांनी केली पाहिजे. जिथे भक्ती नाही तिथे पावित्र्य राखले जात नाही. आता वेळ आली आहे की, हिंदू मंदिरे सरकारी प्रशासनाद्वारे नव्हे, तर हिंदू भक्तांनी चालवायला हवीत. याविषयी त्यांनी माध्यमावरही पोस्ट केली आहे.
श्री श्री श्री श्री रविशंकर यांनीही व्यक्त केला संताप
तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूत गोमांस आढळल्यानंतर श्री श्री श्री रविशंकर यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. तिरुपती लाडू वादामुळे हिंदूच्या मनात संताप निर्माण झालाय. आता मंदिराचे व्यवस्थापन स्वार्थी अधिकाऱ्यांऐवजी धार्मिक नेते आणि भक्तानीच केले पाहिजे. निर्दयी उद्योगपती आणि राजकारण्यांना थोपवू द्या. असं ते म्हणालेत.
वाद थेट दिल्लीत पोहोचला
तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशाच्या तेलाचा वाद दिल्लीपर्यत पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला असून, आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आज (२० सप्टेंबर) सांगितले की, मी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोललो आहे. मंदिराच्या प्रसादाची (लाडू) चाचणी होईल. वायएसआर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप आणि माशाचे तेल मिसळल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री नायडू यांच्या पक्ष टीडीपीने केल्यानंतर हा वाद सुरु झाला आहे.