Sangli Samachar

The Janshakti News

शब्द, मनाच्या पटलावरील... (✒️ राजा सांगलीकर)



| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. २३ सप्टेंबर २०२४
खूप वर्षांपासून मनुष्य माती, विटा, दगड, काष्ठ, झाडाची साले, पाने, कातडे, कापड, कागद अशा विविध माध्यमांचा उपयोग लिहिण्यासाठी, चित्रे काढण्याठी करत आला आहे. १६ व्या शतकापासून काळ्या फळ्यांचा आणि १९६० च्या दशकापासून काळ्या फळ्यांशी साधर्म्य असलेल्या पांढऱ्या फळ्यांचा वापर सुरू झाला. आज ‘आभासी पांढरा फळा - व्हर्च्युएल व्हाईट बोर्ड’ असा शब्द प्रयोग कॉम्प्युटर, मोबाइल मधील सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये, सुविधा देण्यासाठी केला जातो.

आपले विचार लिहिण्यासाठी, उमटवण्याठी, कोरण्यासाठी, रंगवण्यासाठी या सगळ्या पदार्थांचा माध्यम म्हणून वापर आपण आजवर करत आलो आहोत. आणि जो पर्यंत आपण असे करत नाही, तो पर्यंत ही सगळी माध्यमे कोरी राहतात. त्यांचे मूल्य आपण जे विचार शब्द किंवा चित्र रूपाने त्यांच्यावर लिहितो, उमटवतो, कोरतो, रंगवतो त्यावर ठरते. माध्यमावरील विचार जितक्या उच्च दर्जाचे तितकी त्या माध्यमाची किंमत जास्त.  


आपले मन हे ही असेच एक माध्यम आहे, जे सुरवातीला कोरे असते. काळाच्या ओघात आपल्या आजुबाजूचा परिसर, वातावरण, आपली संगत, आपले शिक्षण, वाचन व पाच ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला मिळालेल्या संवेदनातून, त्यामध्ये विचार निर्माण होतात व साठवले जातात. 

चीन देशातील महान तत्वज्ञ लाओ त्झू म्हणतात, “तुमच्या विचारांकडे पहा ते तुमचे शब्द बनतात, तुमच्या शब्दांकडे पहा ते तुमच्या कृती होतात, तुमच्या कृतींकडे पहा त्या तुमच्या सवयीं बनतात, तुमच्या सवयींकडे पहा त्या तुमचे चरित्र बनतात आणि तुमच्या चरित्राकडे पहा ते तुमचे प्रारब्ध बनते.“-२ यातून आपल्याला समजते की, आपल्या मनातील विचारांवर आपले प्रारब्ध, आपल्या जीवनाचे मूल्य, म्हणजेच जीवनातील सुख-दुःख, आनंद-क्लेश, यश-अपयश, संतोष-असंतोष, सर्व कांही ठरते.  

“अंतःकरणातून येणारा आंतरिक विचार खरा हेतू आणि इच्छांचे प्रतिनिधीत्व करतो. जी केले जाणाऱ्या कृतींची कारणे आहेत.- रेमंड हॉलीवेल”--१ याचा सरळ अर्थ आपल्या उद्देश, इच्छांच्या पूर्तीसाठी आपण ज्या कांही कृती करत असतो त्या सर्वांचे मूळ-कारण आपल्या मनातील विचारात असते. आपल्या मनामधील योग्य, सकारात्मक, चांगले विचार आपले दैनंदिन जीवन सुखी, आनंदी, समाधानी करतात, तर आपल्या मनातील अयोग्य, नकारार्थी, वाईट विचार, दिवसातील प्रत्येक क्षण दुःखाचा, क्लेशाचा, असंतोषाचा बनवतात. जीवनात कोणत्या प्रकारच्या विचारांचा वापर करायचा आणि आपले नित्य जीवन कशा प्रकारे जगायचे हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचे असते.   
  
समारोपः आपले विचार आपले जीवन घडवत असतात. ज्या विचाराचा आपण जास्त वापर करतो तो अधिक बलवान होतो व ज्या विचाराला आपण कमी खाद्य देतो तो कमकुवत होतो. आपल्या मनाच्या फळ्यावर आजवर लिहिलेल्या अनेक विचारातील कोणते विचार आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्राधान्याने वापरायचे, आणि कोणते विचार भावी काळात आपल्या मनाच्या फळ्यावर लिहायचे याचे भान आपणच राखायला हवे, नाही कां?

संदर्भः१. इंग्रजी भाषेतील मूळ वचनः “The inner thought coming from the heart represents the real motives and desires. These are the cause of action.”- Raymond Holliwell