| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ सप्टेंबर २०२४
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जातीपातीचे राजकारण न करता सर्व समाजातील मावळ्यांना एकत्र करीत स्वराज्य निर्माण केले. त्यांचाच आदर्श घेऊन सांगलीत मराठा समाजातील तत्कालीन दिग्गज मंडळींनी आंबेडकर मार्गावर सुसज्ज असे मराठा समाज भवन निर्माण केले. या ठिकाणी जातीभेद न मानता लग्न समारंभासह इतर कार्यक्रम अत्यल्प फी घेऊन संपन्न होत असत. छत्रपतींचा आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून येथे 25 वर्षांपूर्वी अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता. मात्र कालानुरूप तो जीर्ण झाला होता. त्यामुळे छत्रपतींचा अवमान होऊ नये म्हणून, मराठा समाजातील मान्यवरांनी एकत्र येऊन या ठिकाणी छत्रपतींचा दर्जेदार, अत्यंत देखणा सिंहासनाधीष्ट पुतळा बसविण्यात आला असून, चार ऑक्टोंबर रोजी केंद्रातील रस्ते वाहतूक मंत्री, आमचे नेते ना. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह देश व राज्य पातळीवरील अनेक सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत एका भव्य समारंभात त्याचे अनावरण संपन्न होणार आहे, अशी माहिती माजी खासदार व पुतळा अनावरण समारंभाचे स्वागत अध्यक्ष मा. संजय काका पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
याबाबत बोलताना मा. संजय काका पाटील म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्णकृती पुतळ्याच्या झालेल्या दुर्घटनेमुळे समाजात नाराजी व्यक्त होत आहे. समाजासमाजात फूट पाडण्याचे काम काही शक्ती करीत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्रित करून स्वराज्य तर मिळवलेच पण सुराज्य ही आणले. त्यांचा आदर्श नव्या पिढीस मिळावा. सर्व समाजात एकोपा रहावा, यासाठी पक्ष विरहित, जातीपाती विरहित, गटातटाचे राजकारण लक्षात न घेता, सर्वच पक्षांच्या व सर्व जाती-धर्माच्या नेत्यांना या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आ. विश्वजीत कदम, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, आ. सुधीर दादा गाडगीळ प्रकाश आंबेडकर, माजी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे माजी खासदार मा. संजय काका पाटील यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमासाठी मराठा समाज भावना शेजारी भव्य मंडप उभारण्यात येणार असून, या ठिकाणी तीन ते चार हजार शिवभक्तांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे असेही मा. संजय काका पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. या पत्रकार बैठकीच्या वेळी मराठा समाजातील ज्येष्ठ नेते संभाजी तात्यासावर्डेकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक घोरपडे, मराठा समाज भवनाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते