Sangli Samachar

The Janshakti News

मुख्यमंत्र्यांच्या एसटी कर्मचारी पगारवाढीच्या इंधनामुळे गोरगरिबांची लाल परी आता पुन्हा धावण्यासाठी सज्ज, प्रवाशातून समाधान !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ सप्टेंबर २०२४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या इंधनामुळे महाराष्ट्र राज्याच्या गोरगरिबांची लाल परी आता पुन्हा धावण्यासाठी सज्ज झाली आहे. सह्याद्री अतिथीगृहांमध्ये एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाचे व्यापक बैठक पार पडली, यामध्ये कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित मागण्यांचाही सरकार सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे काल महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत, व के गुणवत्ता सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील या उपस्थित होत्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तोंडावर हा संप पुकारण्यात आल्यामुळे, मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तसेच राज्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय मार्ग काढतात याकडे संपूर्ण राज्यसह एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.  


अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कर्मचाऱ्यांच्या संघटनांची पाच हजार रुपये वेतन वाढ मागणी असताना एकनाथ शिंदे यांनी तब्बल साडेसहा हजार रुपये दिवाळी भेट दिल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे ज्यांना 5 हजार रुपयांची वाढ 2021 झाली होती, त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 2021 ला ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झाली. ज्यांना अडीच हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात 4 हजार रुपयांची भरघोस वाढ सरकारने केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 250 डेपो आहेत, त्यापैकी काही डेपो दुरुस्त करायचे आहेत, कर्मचाऱ्यांचे विश्रांती गृह आहेत, ते दुरुस्त केले जातील, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

गणेशोत्सव या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे गेले दोन दिवस ठप्प असलेली एसटी सेवा आता पूर्ववत होणार असल्याने सर्व प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.