| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ सप्टेंबर २०२४
नांदेड ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून प्रचंड विरोध होत आहे. याचाच एक भाग म्हणून सांगलीतील स्टेशन चौकात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकतेच येथील स्टेशन चौकात सरकारचे महाळ घातले.
शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उलट-सुलट विधाने करून बाधित शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारचे स्टेशन चौकात महाळ घालून निषेध केला. यावेळी ५०० शेतकऱ्यांना जेवण देण्यात आले. त्याअगोदर प्रभाकर तोडकर यांनी शासनाच्या प्रतिकात्मक प्रतिमेला हार घालून विधिवत पूजा केली. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणा देऊन सरकारचा निषेध करून उपस्थित शेतकऱ्यांना भात, आमटी आणि शिरा असे जेवण दिले.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झाला आहे, असे सांगत आहेत. दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्री शिंदे हे फक्त नांदेड, कोल्हापूरचा विरोध आहे, असे विधान करत आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सांगलीत येणाऱ्या केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णयही घेतला आहे.
यावेळी सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरुगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटील, धनाजी पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.