Sangli Samachar

The Janshakti News

40 लाखांच्या कर्जावर 50 लाखांचे व्याज, बलवडीच्या सावकारावर गुन्हा दाखल !



| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. २२ सप्टेंबर २०२४
घरगुती अडचणीसाठी किंवा व्यवसाय, शेतीसाठी बँका किंवा सहकारी पतपेढी यांच्या कागदपत्रांच्या जंजाळात कर्जाची उपलब्धता होत नसल्याने, सहज उपलब्ध होणाऱ्या कर्जाकरिता अनेकजण नाईलाजाने सावकाराची पायरी चढत असतात. परंतु पठाणी व्याज आकारणीमुळे हे कर्ज फिटता फिटत नाही. परिणामी कर्जदारांना आपले सर्वस्व घालवावे लागते. अनेक जण सावकाराच्या तगादिला वैतागून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. असाच एक प्रकार खानापूर तालुक्यातील बलवडे येथे घडला. 

मुलाच्या आजारपणावरील उपचारासाठी व काजू प्रक्रिया व्यवसाया करिता, दरमहा तीन टक्के व्याज दराने घेतलेल्या 40 लाख रुपये कर्जावर 50 लाख रुपये व्याज लावून, त्याच्या वसुलीसाठी तगादा लावलेल्या सावकाराविरुद्ध बलवडी तालुका खानापूर येथे मनोहर ईश्वर पवार यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार जगन्नाथ पवार या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बनवडी येथील मनोहर पवार यांनी मुलाच्या औषध उपचारासाठी व काजू प्रक्रिया व्यवसाय करता गावातीलच खाजगी सावकार जगन्नाथ पवार यांच्याकडून जुलै 2017 ते मे 2020 या दरम्यान वेळोवेळी चाळीस लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी आतापर्यंत जगन्नाथ पवार यांना दरमहा तीन टक्के व्याजदराने वीस लाख रुपयांची परतफेड केली होती. तरीही संशय जगन्नाथ पवार यांनी मनोहर पलूस व बनवडी येथील घरी रात्री अपरात्री जाऊन मनोहर पवार यांच्याकडे व्याजाच्या पैशासाठी तगादा लावला होता. 30 जून 2023 रोजी जबरदस्तीने जगन्नाथ पवार यांनी मनोहर पवार यांच्या मालकीचे बलवडी येथील गट नंबर 230 मध्ये 67.87 आर. व गट नंबर 113 मधील 59.68 आर. क्षेत्र रक्कम रुपये 90 लाख हे पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करार पत्र साठेखत करून घेतले होते. यान करार पत्राच्या आधारेच जगन्नाथ पवार हा मनोहर पवार शिवीगाळ व दमदाटी करीत होता. शेवटी जगन्नाथ पवार यांच्या तागाद्याला कंटाळून मनोहर पवार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर, विटा पोलिसांनी सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 व कलम 308 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.