| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑगस्ट २०२४
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने, काही अपवाद वगळता संपूर्ण राज्यातील नद्यांनी इशारा किंवा धोक्याची पातळी गाठलेली आहे. पुणे, कोल्हापूर शहरात तर नागरी वस्तीत पुराच्या पाण्याने हाहा:कार उडवला आहे. सांगली जिल्ह्यात मात्र कृष्णा-वारणेने इशारा पातळी गाठली असली, तरी नागरी वस्तीचे असे नुकसान झाले नाही. मात्र येथील नागरिकांना विस्थापित व्हावे लागले.
या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट दिल्याने कृष्णा वारणा काठ पुन्हा धास्तावलेला होता. 39 फुटापर्यंत पोहोचलेली पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर जाईल की काय, अशी भीती नागरिकांतून व्यक्त करण्यात येत होती. सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिकेतर्फे येथील नागरिकांना स्थलांतरित होण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नागरिकात अधिकच भीतीचे वातावरण होते. परंतु सांगलीतील आयुर्विन पुलाजवळची पाणी पातळी चाळीस फुटापर्यंतच स्थिर राहिली.
परिणामी काही ठराविक भाग वगळता, शहरातील इतर पूरपट्ट्यातील नागरिकांना या महापुराचा त्रास झाला नाही. विशेषतः मेन रोड हरभट रोड मारुती रोड येथील व्यापाऱ्यांना 2019 च्या प्रलयंकारी महापुराची आठवण आली. आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती उद्भवेल की काय अशी भीती त्यांच्यातही व्यक्त होत होती. काही व्यापाऱ्यांनी तर आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलवलेले होते. मात्र सुदैवाने अजूनही कृष्णचा महापूर नदी पात्राच्या आसपासच रेंगाळतो आहे. कृष्णा नदीतील सध्याची पाणी पातळी पाहता, यंदा महापुराचा तडाखा सांगलीला बसणार नाही हे नक्की.