Sangli Samachar

The Janshakti News

हिंदुत्वाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याकरिता नितीन शिंदे यांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्रातील ज्या ज्या किल्ल्यावर अतिक्रमण झाले आहे ते काढायचे असेल तर विधे मंडळात कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा शिवभक्त आमदार निवडून गेला पाहिजे, भाजप पक्षाकडे हिंदुत्ववादी उमेदवार म्हणून मला संधी द्यावी अशी मागणी, माजी आमदार व विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली आहे.

प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणावर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हिंदुत्ववादी संघटना, सर्व शिवभक्त व हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते दीपकबाबा शिंदे, प्रसिद्ध उद्योजक मनोहर सारडा, व्यापारी संघटनेचे प्रदीप बोथरा, गायत्री परिवाराचे प्रमुख 
 नरेंद्र भाई जानी यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दीपकबाबा शिंदे व मनोहर सारडा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


या सत्कार समारंभात मनोगत व्यक्त करताना नितीन शिंदे म्हणाले की प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या बेकायदेशीर दर्ग्याच्या विरोधात आवाज उठवून तो जमीन दस्त करायला सरकारला भाग पाडले. आता विशाल गडावरील इस्लामिक अतिक्रमण व मुस्लिम हजरत पीर मलिक ए रेहानच्या नावे असलेला बेकायदेशीर दर्गा सुद्धा उद्वस्त करायला आपण भाग पाड. त्याचप्रमाणे विशाळगडा बरोबरच महाराष्ट्रातील ज्या ज्या किल्ल्यावर अतिक्रमण झाले आहे ते काढायचे असेल तर विधिमंडळात कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा शिवभक्त आमदार निवडून गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी भाजपकडे सांगली विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारीची मागणी केली.

यावेळी मान्यवरांनी उपस्थित केलेल्या मागणीचा धागा पकडून नितीन शिंदे म्हणाले की आपण केलेल्या मागणेचा आदर राखून मी पक्षाकडे हिंदुत्ववादी उमेदवार म्हणून मला संधी द्यावी अशी मागणी करतो. विशाळगडासह सर्व गड किल्ल्यावरील इस्लामिक अतिक्रमणाविरोधी आवाज उठवण्यासाठी तसेच लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा, बेकायदा मशिदींची दिवसेंदिवस वाढणारी संख्या या विरोधात आवाज उठवण्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मला पक्षाने उमेदवारी द्यावे अशी मागणी शिंदे यांनी केली. लोकसभेला जसा हिरवा गुलाल उधळाला गेला हिरवे झेंडे नाचवले हे जर घडायचे नसेल तर पक्षाने माझ्यासारख्या हिंदुत्ववादीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करून नितीन शिंदे म्हणाले की, विधान परिषद आमदार असताना शालेय पोषण आहार घोटाळा, सिविल हॉस्पिटल जमीन घोटाळा, मिरज शासकीय दूध डेअरी जमीन घोटाळा, इंदिरा गृह निर्माण संस्था घोटाळा, वानलेस चेस्ट हॉस्पिटल जमीन घोटाळा हे घोटाळे उघड हाणून पाडले. यावेळी आमदार म्हणून संधी मिळाली तर, सांगलीसह राज्यातील घोटाळ्यांचा पर्दाफाश करू, असे आश्वासन नितीन शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी बोलताना ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या की राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता विधानसभेमध्ये हिंदूंचे प्रश्न मांडण्यासाठी कट्टर हिंदुत्ववादी व शिवभक्त आमदाराची गरज आहे आणि ती गरज माजी आमदार नितीन शिंदे भरून काढू शकतात. 

ज्येष्ठ व्यापारी मनोहर सारडा म्हणाले की, भाजपाने माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासारख्या कडव्या हिंदुत्ववाद्याला व लोकनेत्याला उमेदवारी दिल्यास त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकतीने उभे राहू.

आपल्या भाषणात बोलताना मनोज साळुंखे म्हणाले की, माजी आमदार नितीन शिंदे जर आमदार असते, तर रखडलेले चिंतामणी नगर पुलाचे काम कधीच पूर्ण होऊन व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले नसते. पर्यायी पूल बांधल्याशिवाय नवा पूल बांधण्याची परवानगी दिली नसती. 

सुरुवातीस हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी नरेंद्र भाई जानी, शिवाजी पाटील, अरुण वाघमोडे, शैलेश पवार व अविनाश मोहिते यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

या कार्यक्रमास युवराज बावडेकर, उर्मिला बेलवलकर, महेंद्र चंडाळे, श्रीकांत शिंदे पंडितराव बोराडे, रावसाहेब खोजगे, महेश चौगुले, महेश शेळके, राजू रसाळ, स्मिता पवार, दत्ता भोकरे, परशुराम चोरगे, विष्णुपंत पाटील, राजू जाधव, सोमनाथ गोटखिंडे, तानाजी शिंदे आधी कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणावर शिवभक्त कार्यकर्ते उपस्थित होते.