Sangli Samachar

The Janshakti News

आई-वडील कट्टर काँग्रेसवादी, पण मुलीने हाती घेतली राष्ट्रवादीची तुतारी; जिल्ह्यात चर्चेला उधाण !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑगस्ट २०२४
स्व. प्रकाशबापू, स्व. विष्णूअण्णा आणि स्व. मदन पाटील कट्टर काँग्रेसवादी. आई श्रीमती जयश्रीताई याही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत स्व. वसंतदादांचा वारसा पुढे चालवणाऱ्या... परंतु या घराण्यातीलच कन्येने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतल्याने, जिल्ह्याच्या राजकारणातील ही नव्या वादळाची दिशा तर नव्हे ना ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

तसं पाहायला गेलं तर, काँग्रेसमध्ये गळचेपी होत असल्याच्या भावनेने स्व. मदन भाऊंनी थोरल्या पवार साहेबांचे घड्याळ मध्यंतरी हाती बांधले होते. परंतु तेथेही त्यांच्या कर्तृत्वाला वाव न मिळाल्याने ते स्वगृही परतले आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली. परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्याने, सैरभैर झालेल्या मदन पाटील गटाला स्व. मदन भाऊंच्या धर्मपत्नी श्रीमती जयश्रीताईंनी मोठी उभारी दिली. प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत हा गट अजूनही आपला स्वतंत्र बाणा जपत स्वतःचे स्थान निर्माण करीत आहे.


मध्यंतरी वाढदिवसाच्या निमित्ताने सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ श्रीमती जयश्रीताईंना शुभेच्छा देण्यासाठी बंगल्यावर पोहोचल्यानंतर, ताई भाजपचे कमळ हाती घेणार अशी आवई उठली. मात्र त्याचवेळी स्वतः जयश्रीताईंनी याचे खंडन केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. जयंत पाटील यांनीही त्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र श्रीमती जयश्री ताईंनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. मात्र तरीही जयश्रीताईंना व मदनभाऊ गटाला डावलले जात असल्याची भावना खदखद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू असते. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमती जयश्रीताईंनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी मदन भाऊ पाटील गट आग्रही आहे. मात्र श्रेष्ठींकडून याला पाठबळ न मिळाल्याने जयश्रीताई व त्यांचा गट स्वातंत्रपणे विधानसभेसाठी पेरणी करतो आहे. श्रीमती जयश्री ताईंनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोणतीही पर्वा न करता विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहण्याची भूमिका घेतली. तत्पूर्वी आणि तदनंतरही जयश्री ताई काँग्रेसच्या व्यासपीठावर आपली उपस्थिती दर्शवित आहेत. अनेक आंदोलनात त्यांनी आघाडीवर राहून नेतृत्व केले आहे. सध्या जयश्रीताई अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून दिसू लागल्या आहेत.


या साऱ्या पार्श्वभूमीवर मदन भाऊंच्या कन्या सोनिया पाटील-होळकर यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. होळकर घराणे ज्याप्रमाणे ऐतिहासिक तसेच राजकीय वर्तुळात स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण करणारे. परंतु हे घराणे राष्ट्रवादी शरद पवार गटातील व्यासपीठावर अधिक रमते. आणि याच घराण्याची सून असलेल्या, सौ. सोनिया सत्यजित होळकर या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या संचालकपदी कार्यरत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नाशिक शहर युवती आघाडीची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. आता त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या हस्ते सौ. सोनिया होळकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नाशिकचे निरीक्षक आ. सुनील भुसारा, गोकुळ पिंगळे दत्तात्रय पाटील हे उपस्थित होते.