Sangli Samachar

The Janshakti News

वालचंद अभियांत्रिकीतील नोकरी मेळाव्यात दोन हजारावर तरुणांना रोजगार - बजरंग पाटील


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ ऑगस्ट २०२४
सांगली येथे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व शिवसेना ठाकरे गटाचे नेते बजरंग पाटील यांच्यातर्फे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय येथे रविवारी झालेल्या क्यू. जी. पी. आर. नोकरी मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास सात हजार इच्छुक उमेदवाराने हजेरी लावली. त्यातील दोन हजार युवकांची विविध कंपनीत विविध पदावर नियुक्त्या दिल्या. सांगली जिल्ह्यातील दोन हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून झाल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक बजरंग पाटील यांनी आज दिली. 

नोकरी मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मेळाव्याचे उदघाटन हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचे संचालक दीपकबाबा शिंदे यांनी केले. यावेळी वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य उदय दबडे, उद्योगपती श्रीनिवास पाटील, रमेश आरवाडे, भाजपच्या नेत्या नीता केळकर, शेखर इनामदार, शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या संघटिका मनिषाताई पाटील, शहर प्रमुख विराज बुटाले, समृद्धी इंडस्ट्रीजचे रमाकांत मालू, सांगली मिरज कुपवाड चेंबर ऑफ कॉमर्सचे सतीश मालू, तुकाराम बाबा बागडे,हर्षवर्धन पाटील, रावजी गोसावी आदि उपस्थित होते. 


संयोजक बजरंग पाटील म्हणाले, या रोजगार मेळाव्यात दोन हजारहून अधिक जणांची आत्मविश्वासाची पायाभरणी झाली. त्यांच्या जीवनाची कारकीर्द सुरू झाली. पुणे, बंगळूर सारख्या मोठ्या शहरात जितक्या पगाराचे पॅकेज मिळते, त्याच्या तोडीस तोड सांगलीतही मिळू शकते, हे मेळाव्याने सिध्द केले. प्रत्येक वर्षी नोकरी महामेळावा घेऊ, असा निर्धार व्यक्त केला. 

मेळाव्यासाठी ॲक्सिस बँक, रिलायन्स निऑन, अव्हिवा इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, हिंदुस्थान लॉयन्स, बालाजी ऑटो, टेकबुक्स, आशिष मोटर्स, जयसन्स फाउंड्री, महाबळ फाउंड्री, धनप्रकाश इंडस्ट्री, क्रेव्हीश इंडस्ट्री यासह अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कंपन्यांच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून योग्य उमेदवारांची निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. दोन लाखापासून साडेसात लाखापर्यंत वेतनाचे पॅकेज युवकांना मिळाले. सांगली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. क्यू. जे. पी .आर. ग्रुपचे मारुती गायकवाड व पवन कुमार मालू यांच्या सहकार्याने हा मेळावा यशस्वी करण्यात आला.