Sangli Samachar

The Janshakti News

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आरुढ होणाऱ्या घोड्यावरचं खोगीरच काँग्रेसनं काढून घेतलं !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ ऑगस्ट २०२४
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी काँग्रेससह इतर पक्षांच्याही नेत्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी महत्त्वाच्या होत्या. यामध्ये सोनिया व राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी ठाकरे यांची भेट प्रदीर्घ आणि चर्चेचे ठरली. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत ही भेट होती असे सांगण्यात येत असले तरी, विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांना मान्यता द्यावी, हे या भेटीमागचे खरे कारण होते. परंतु तत्पूर्वीच महाराष्ट्र प्रभारींनी ठाकरे यांच्या बद्दलची जनतेतील व महाआघाडीतील नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली होती. त्यामुळे दिल्लीश्वरांनी ठाकरे यांना ताकास तूर लागू दिला नाही. परिणामी 'ज्या मुख्यमंत्रीपदाच्या घोड्यावर उद्धव ठाकरे बसणार होते, त्याचे खोगीरच काँग्रेसने काढून घेतले', अशी खोचक चर्चा आता देशाच्या राजधानीसह राज्याच्या राजधानीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे.


उद्धव ठाकरे यांचे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर बसण्याचे स्वप्न सर्वश्रुत आहे. त्यांचे एकनिष्ठ शिलेदार संजय राऊत यांनी तर, 'भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा राज्याभिषेकच करून टाकला आहे'. परंतु प्रथम शरद पवार यांनी त्याला विरोध केला आणि आता काँग्रेस श्रेष्ठीनी, "प्रथम जागावाटप एकमताने ठरवूया, आणि मग 'मुख्यमंत्र्याचा चेहरा' याबाबत बोलूया." असे सांगून, उध्दव ठाकरे यांच्या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

आणि म्हणूनच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी 'मुख्यमंत्र्याचा चेहरा' हा मुद्दा कळीचा ठरतो की काय अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत सांगलीसह काही जागांवर राऊत-ठाकरे या जोडीने घोळ घातला. हा निस्तरता निस्तरता महाआघाडीच्या नेत्यांना तोंडाला फेस आला. आणि म्हणूनच आता ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेला धुमारे फुटण्यापूर्वीच, त्याच्या चिंधड्या उडवण्याचे काम महाआघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी केले आहे, असे ठाकरे यांच्या विरोधकाकडून बोलले जाऊ लागले आहे.