Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्र शासनाची आता लाडका शेतकरी योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा !


| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. २३ ऑगस्ट २०२४
मुख्यमंत्री लाडकी योजना झाली, त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली, परत लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड येथे बोलताना केले कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांना थेट पिकाला मार्केट उपलब्ध करून देणे होय. आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट उपलब्ध करून देण्याचं काम आहे. कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून, साडेसात अश्‍वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे करणार आहोत. शेतकऱ्यांचाही कल्याण झालं पाहिजे. सोयाबीन आणि कापसाला हेक्‍टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णयही आम्ही घेतला असून याची मर्यादा दोन हेक्टर पर्यंत असणार असल्याची घोषणाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकार लोकप्रिय योजना राबवत असून राज्यातील अधिकाधिक नागरिकांना आर्थिक लाभ देण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असून, त्याचा फायदा मतांमध्ये परिवर्तित करण्याचाही सरकारचा इरादा आहे. त्यामुळे अनेकानेक योजना सरकार जाहीर करीत आहे.