yuva MAharashtra ठरलं तर मग... गणरायाचे आगमन ठरणार, भावी आमदारांसाठी भाग्याचे...

ठरलं तर मग... गणरायाचे आगमन ठरणार, भावी आमदारांसाठी भाग्याचे...


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ ऑगस्ट २०२४
विद्यमान विधानसभेची मुदत जसजशी संपत आहे, तसतसा 'गोंधळात गोंधळ' चित्रपट रंगतो आहे. एकीकडे महाआघाडीतील नेत्यांनी महायुतीला कोंडीत पकडण्यासाठी नवनवे अस्त्र शोधून काढणे सुरू केले आहे, तर त्याला तोडीस तोड उत्तर देत महायुती हे अस्त्र, निरस्त्र करण्यासाठी पलटवार करणे सुरू ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर पर्जन्यवृष्टी बरोबरच आश्वासनाची वृष्टी मतदारांवर सुरू आहे.

या धामधुमीत पुढील सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकीची पडघम वाजण्याचे संकेत मिळत आहेत. 26 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेची मुदत संपत आहे तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. या दृष्टीने निवडणूक आयोग तारखेच्या शोधात असून, 10 ऑक्टोबर 2024 पूर्वी नवीन सरकारची करता येईल का, याची चाचणी सुरू आहे. महाराष्ट्र प्रमाणेच हरियाणा विधानसभेची 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. या दोन्ही निवडणुका नेहमीप्रमाणेच एकत्रित घेता येतील का याचाही अंदाज निवडणूक आयोग घेत आहे 2009 पासून दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्रित होत असतात. त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यास महाराष्ट्राची निवडणूक दीड महिन्यापूर्वी तर हरियाणाची निवडणूक प्रक्रिया वीस दिवस आधीच पूर्ण होईल.


सध्या महाराष्ट्रात विद्यमान सरकारच्या विरोधात वातावरण असून भाजप अंतर्गत केलेल्या सर्वेत, पक्ष केवळ 60 ते 70 जागा पर्यंतच पोहोचू शकेल अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाआघाडी सत्तेच्या दिशेने धावू लागली आहे. या अहवालाचा अंदाज आल्यानंतर महायुतीत खळबळ तर महाआघाडीत आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत विजयी मुसंडी मारली होती त्याप्रमाणेच विधानसभेतही काँग्रेस मोठा भाऊ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

अर्थात नेहमीप्रमाणे शिवसेनेने महाआघाडीच्या ऐक्यात मिठाचा खडा टाकला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच नाशिक विधानसभा मतदारसंघात सांगलीची पुनरावृत्ती करण्याचा डाव शिवसेनेच्या नेत्यांनी टाकला आहे. तेथील दोन्ही विधानसभा निवडणुकीच्या जागेवर शिवसेनेने आपला हक्क सांगितला असून उमेदवारही जाहीर केले आहेत. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने थयथयाट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. "तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना" असा प्रकार महाआघाडीत सध्या सुरू आहे. आणि तो असा सुरू राहिला तर. सत्तेचे स्वप्न कसे पूर्ण होणार ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.