Sangli Samachar

The Janshakti News

बदलापूरच्या पार्श्वभूमीवर शासन अलर्ट मोडवर, विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जीआर !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ ऑगस्ट २०२४
बदलापूर, अकोला, पुणे येथील मुलींवरील अत्याचाराने सारा महाराष्ट्र हळहळत आहे. यातील आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अलर्ट मोडवर आले असून, हातात प्रत्येक शाळेतील सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, मदतनीस, स्कूल बसचे चालक या सर्वांचा शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेला द्यावा लागणार आहे. याबाबतचा जीआर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला असून याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती कौशल्य रोजगार व उद्योजकता मंत्री तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.


काय आहे शासन निर्णयामध्ये ?

- शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक.

- सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूलबसचे चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक.

- सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन.

- शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन पुढील एका आठवड्यात करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश.

- शाळांमध्ये तक्रार पेटींचा देखील प्रभावीपणे वापर व्हावा.

- राज्यस्तरीय सुरक्षा आढावा समितीचे देखील गठन करण्यात आले असून अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त असणार, सोबत आणखी सहा सदस्य समितीत असणार.

- शालेय विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापनाने तो न दडवता शिक्षणाधिकाऱ्यांना सांगावा अन्यथा कारवाई आदेश.

- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश.


संरक्षणाची जबाबदारी

महिला आणि मुलींना स्व संरक्षणाचे धडे द्यावेत, त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर महिला व बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारसह समाज म्हणून आपल्या सर्वांचीच आहे, त्यामुळे असे अनुचित प्रकार घडू नयेत, याकसाठी आपण सर्वांनी जागृत रहावं, असे आवाहन लोढा यांनी केले आहे.